unauthorized-coaching-buildings : लखनौमधील भीषण आगीच्या दुर्घटनेनंतर शैक्षणिक संस्थांमधील अग्निसुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून नागपुरातील कोचिंग क्लासेसच्या सुरक्षेबाबत धक्कादायक वास्तव समोर आले आहे. नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने केलेल्या तपासणीत कोचिंग क्लासेस चालणाऱ्या १४१ इमारतींपैकी तब्बल १०३ इमारती असुरक्षित आढळून आल्या आहेत. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
- सदरमधील आगीनंतर वाढले गांभीर्य
६ मे रोजी सदर येथील एका कोचिंग संस्थेजवळ लागलेल्या आगीत सुमारे १५० विद्यार्थी थोडक्यात बचावले होते. या घटनेनंतर अग्निशमन विभागाने शहरातील कोचिंग संस्थांची व्यापक तपासणी मोहीम हाती घेतली.
- नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई
तपासणीत अनेक ठिकाणी अग्निशमन यंत्रणा, आपत्कालीन मार्ग आणि जीवन सुरक्षा उपाययोजनांचा अभाव आढळून आला. त्यामुळे संबंधित संस्थांवर महाराष्ट्र अग्निशमन प्रतिबंधक आणि जीवन सुरक्षा उपाययोजना अधिनियम २००६ अंतर्गत कारवाई सुरू करण्यात आली आहे. नियमांचे पालन न करणाऱ्या ४० संस्थांविरोधात वीज व पाणीपुरवठा खंडित करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
- एफआयआरचीही कारवाई
अग्निसुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १५ प्रकरणांमध्ये पोलिसांकडे एफआयआर नोंदविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तसेच मंजूर आराखड्यांचा गैरवापर आणि निवासी जागांमध्ये परवानगीशिवाय कोचिंग क्लासेस चालवल्याप्रकरणी ६० संस्थांची प्रकरणे संबंधित विभागांकडे पाठविण्यात आली आहेत.
- पालन करणाऱ्या संस्था मोजक्याच
महिनाभर सुरू असलेल्या तपासणी आणि नोटिसांनंतरही केवळ ३७ संस्थांनी आवश्यक अग्निसुरक्षा उपाययोजनांचे पालन केल्याचे प्रमाणपत्र सादर केले आहे. त्यामुळे प्रशासनाने कारवाई अधिक तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत.