वर्धा,
Wardha municipal schools सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना नपच्या शाळांमध्ये कमी खर्चात गुणवत्तापुर्वक, दर्जेदार शिक्षण उपलब्ध व्हावे, यासाठी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी पुढाकार घेतला आहे. या शाळांतील शैक्षणिक सुधारणांसाठी ७ कोटी ७६ लाखाचा निधी उपलब्ध करून दिला आहे.
रामनगर येथील चित्तरंजन दास प्राथमिक शाळेत डिजिटल लायब्ररी व स्पर्धा परीक्षा केंद्रासाठी १ कोटी ४९ लाख तर वातानुकुलीत अभ्यासिकेसाठी ४९ लाख ९६ हजाराचा निधी देण्यात आला. शिवाजी प्राथमिक शाळेत वातानुकूलीत अभ्यासिकेसाठी ४९ लाख ९८ हजार, वसंत प्राथमिक शाळा, विवेकानंद शाळेचे नुतनीकरण व आवश्यक शैक्षणिक सुविधेसाठी १ कोटी ५० लाख, कमला नेहरू शाळेत ई-वाचनालय व रीडिंग हॅाल तयार करणे ९९ लाख ९८ हजार देण्यात आले. नगरपरिषदेच्या विविध शाळांमध्ये विविध विकास कामे १ कोटी ९९ लाख, स्वामी विवेकानंद शाळेत सुरक्षा भींत बांधकाम व मैदान विकसित करणे ९ लाख ९० हजार, वसंत प्राथमिक शाळेत गेटचे काम व मैदान विकसित करणे ९ लाख २२ हजार इतका निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. लाला लजपतराय शाळेभोवती संरक्षण भिंतीचे बांधकाम करण्यासाठी ५८ लाख ८९ हजराचा निधी देण्यात आला आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले डिजिटल वाचनालय वातानुकूलित असून हायस्पीड वाय-फाय इंटरनेट, डिजिटल ई-बुस आणि ई-वाचनालय, स्वतंत्र केबिन्स आणि प्रशस्त टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे.
शाळेचे संपूर्ण विद्युतीकरण आणि अद्ययावत प्लंबिंगच्या कामांमुळे शाळा आता अधिक सोयीस्कर बनल्या आहेत. स्वतंत्र परीक्षा केंद्रांची स्थापना केली जात आहे.
.
खाजगी शाळांच्या तोडीच्या सुविधा : ना. डॉ. भोयर
विद्यार्थ्यांना खाजगी शाळांच्या तोडीच्या सुविधा सरकारी शाळेतच मिळाव्यात, यासाठी आपला प्रयत्न आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेला निधी वर्धेतील विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मैलाचा दगड ठरेल. आमचे ध्येय केवळ साक्षरता वाढवणे नसून विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देऊन त्यांना स्पर्धेत टिकवून ठेवणे हे आहे. ’क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले डिजिटल वाचनालय’ हे याचेच एक पाऊल आहे. वर्धेतील शाळा आता ’मॉडेल शाळा’ म्हणून ओळखल्या जातील आणि इतर शहरांसाठी प्रेरणादायी ठरतील, असे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी सांगितले.