तमाशा सुरू, वेदना असह्य…आणि फडातच झाला बाळाचा जन्म!

    दिनांक :24-Jun-2026
Total Views |
मुंबई,
Who is Vitthabai Narayangaonkar अभिनेत्री श्रद्धा कपूर हिच्या आगामी 'इथा' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर महाराष्ट्राच्या लोककलेतील एक तेजस्वी नाव पुन्हा चर्चेत आले आहे. लावणी सम्राज्ञी विठ्ठाबाई नारायणगावकर. हा चित्रपट त्यांच्या आयुष्यावर आधारित असून त्यांच्या संघर्षमय प्रवासाची कहाणी मोठ्या पडद्यावर मांडली जाणार आहे. विठ्ठाबाई नारायणगावकर या महाराष्ट्रातील तमाशा, लावणी आणि लोककलेच्या विश्वातील अत्यंत मानाचे व्यक्तिमत्त्व होत्या. लहान वयातच त्यांनी रंगमंचावर पाऊल ठेवले आणि आपल्या अद्वितीय कला, दमदार आवाज आणि प्रभावी सादरीकरणाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. त्यांच्या सादरीकरणात असलेली ऊर्जा आणि जिवंतपणा यामुळे त्या घराघरात पोहोचल्या.
 
 
 
Vithabai
त्यांच्या आयुष्यातील सर्वात हृदयस्पर्शी आणि थरारक प्रसंग आजही अनेकांना प्रेरणा देतो. तमाशाच्या कार्यक्रमादरम्यानच त्यांना प्रसूती वेदना सुरू झाल्या. परिस्थिती अत्यंत कठीण असतानाही त्यांनी हार मानली नाही. फडातच त्यांनी बाळाला जन्म दिला आणि प्रसूतीनंतरही अवघ्या काही वेळात पुन्हा रंगमंचावर उभे राहून कला सादर केली. कलेप्रती असलेली त्यांची निष्ठा आणि जिद्द याच घटनेतून स्पष्टपणे दिसून येते. विठ्ठाबाई नारायणगावकर यांना त्यांच्या योगदानासाठी अनेक मान-सन्मान मिळाले. त्यांच्या लोककलेतील अमूल्य कार्याची दखल राष्ट्रीय स्तरावरही घेण्यात आली. त्यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र सरकारने जीवनगौरव पुरस्काराची सुरुवात केली, जो लोककलेत विशेष योगदान देणाऱ्या कलाकारांना दिला जातो. आजही विठ्ठाबाई नारायणगावकर यांचे नाव घेतले की महाराष्ट्राच्या लोककलेचा सुवर्णकाळ डोळ्यासमोर उभा राहतो. संघर्ष, जिद्द आणि कलेवरील अपार प्रेम यांची त्यांची कहाणी नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरत आहे.