नागपूर,
base school १२व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त बेस स्कूलमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात योगाभ्यास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावर्षीच्या योग दिनाची संकल्पना “निरोगी व सक्रिय वृद्धत्वासाठी योग (Yoga for Healthy Aging)” अशी होती. कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थना आणि योग जनजागृती संदेशाने करण्यात आली. विद्यालयाचे प्राचार्य गौरव माहुले यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी विविध योगासने व प्राणायामांचा सराव केला. यामध्ये कपालभाती, अनुलोम-विलोम, भ्रामरी, सूर्यनमस्कार, ताडासन यांसह विविध योगक्रियांचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.
प्राचार्य गौरव माहुले यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात योगाचे महत्त्व विशद करताना योग ही भारतीय संस्कृतीची अमूल्य देणगी असल्याचे सांगितले. नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहते, असेही त्यांनी नमूद केले. विद्यालयाचे संचालक दिनेश गौर, सोनू बुर्रेवार आणि नरेंद्र वानखेडे यांनी सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा देत निरोगी जीवनशैली अंगीकारण्याचे आवाहन केले.
यावेळी शारीरिक शिक्षक लालसिंह यादव यांनी आपल्या संदेशात सांगितले की, “योग हा केवळ व्यायाम नसून निरोगी शरीर, शांत मन आणि सकारात्मक जीवनाचा पाया आहे. नियमित योगाभ्यासामुळे व्यक्ती शारीरिकदृष्ट्या सक्षम, मानसिकदृष्ट्या एकाग्र आणि भावनिकदृष्ट्या संतुलित राहते. प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करावा.” या कार्यक्रमात सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. शेवटी सर्वांनी नियमित योगाभ्यास करून निरोगी आणि आनंदी जीवन जगण्याचा संकल्प केला.
सौजन्य: लालसिंह यादव, संपर्क मित्र