होर्मुझमधून ३० भारतीय जहाजांचा सुरक्षित प्रवास

    दिनांक :25-Jun-2026
Total Views |
नवी दिल्ली,
30 Indian ships through Hormuz मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारताकडे येणाऱ्या ३० मालवाहू जहाजांनी होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरक्षितपणे प्रवास पूर्ण केला असून आणखी २६ जहाजे या महत्त्वाच्या सागरी मार्गातून पुढे जाण्यासाठी प्रतीक्षेत आहेत. नौवहन मंत्रालयातील सूत्रांनी ही माहिती दिली आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, सुरक्षित मार्गक्रमण केलेल्या ३० जहाजांमध्ये मोठ्या प्रमाणात ऊर्जा उत्पादनांची वाहतूक करणाऱ्या जहाजांचा समावेश आहे. यापैकी जवळपास निम्मी जहाजे एलपीजी आणि एलएनजी वाहतूक करत होती. तसेच आठ जहाजे बल्क कार्गो घेऊन येत होती, तर सात जहाजे कच्च्या तेलाची वाहतूक करणारी टँकर्स होती.
 
 

 Hormuz 
 
१ मार्च ते १७ जून या कालावधीत १९ जहाजांनी होर्मुझ सामुद्रधुनी पार केली होती. मात्र, इराण-अमेरिका सामंजस्य करारानंतर परिस्थितीत काही प्रमाणात स्थिरता आल्याने आणखी ११ जहाजांनी सुरक्षित प्रवास केल्याचे सांगितले जात आहे.भारतीय बंदरांकडे येणाऱ्या या जहाजांपैकी १७ जहाजे परदेशी ध्वजाखाली कार्यरत आहेत. यामध्ये मार्शल आयलंड्सच्या ध्वजाखालील पाच जहाजांची संख्या सर्वाधिक आहे. सध्या भारतीय हितसंबंधांशी संबंधित २६ जहाजे होर्मुझच्या पश्चिमेकडील पर्शियन आखातात थांबलेली आहेत. या जहाजांमध्ये भारतीय आणि परदेशी ध्वजांकित जहाजांचा समावेश आहे.
 
प्रतीक्षेत असलेल्या २६ जहाजांपैकी तीन जहाजे ऊर्जा उत्पादने घेऊन येत आहेत, १० जहाजे खतांची वाहतूक करत आहेत, तर उर्वरित १३ जहाजे विविध प्रकारचा माल घेऊन भारताकडे रवाना होणार आहेत. होर्मुझची सामुद्रधुनी ही जगातील सर्वात संवेदनशील आणि महत्त्वाची सागरी वाहतूक मार्गांपैकी एक मानली जाते. जागतिक ऊर्जा पुरवठ्यापैकी जवळपास २० टक्के पुरवठा या मार्गातून होतो. भारतासाठी हा मार्ग अधिक महत्त्वाचा मानला जातो, कारण देशाच्या एलएनजी आणि एलपीजी आयातीचा मोठा हिस्सा आखाती देशांतून याच मार्गाने येतो. त्यामुळे या मार्गावरील स्थिती स्थिर राहणे भारताच्या ऊर्जा सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.