अमरावती,
amravati-congress-ubatha : नेते, माजी आमदारांचे पुत्र व काँग्रेसचे नेते, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश साबळे यांनी आज आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह युवा स्वाभिमान पार्टीत प्रवेश केला. तसेच शिवसेना उबाठाच्या दिडशे कार्यकर्त्यांनी स्वाभिमानचा झेंडा हाती घेतला. दोन्ही पक्षांना हा मोठा धक्का मानला जात आहे. पक्षाच्या वतीने यावेळी महत्त्वाच्या नियुक्त्या देखील करण्यात आल्या.

अभियंता भवन जाहीर पक्षप्रवेश व पदग्रहण सोहळा आयोजिण्यात आला होता. यावेळी युवा स्वाभिमान पार्टीचे संस्थापक आमदार रवि राणा यांच्या हस्ते सर्व नवप्रवेशितांचे पक्षाचा दुपट्टा परिधान करून व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमस्थळी कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती. घोषणाबाजी, टाळ्यांचा कडकडाट आणि जल्लोषाच्या वातावरणात हा सोहळा पार पडला. आ. राणा म्हणाले, प्रकाश साबळे यांच्यासारखे जनतेशी जिव्हाळ्याचे नाते जोडणारे, सर्वसामान्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणारे आणि निस्वार्थपणे समाजसेवा करणारे कार्यकर्ते युवा स्वाभिमान पार्टीची खरी ताकद आहेत. पक्षाला अशाच जनाधार असलेल्या नेतृत्वाची गरज असून त्यांच्या प्रवेशामुळे पक्ष संघटना अधिक मजबूत होईल. अमरावती विधान परिषद निवडणुकीत शून्य मते मिळवणाऱ्या काँग्रेसने चिल्लुभर पाण्यात डुबुन मरण्याची आता खऱ्या अर्थाने गरज आहे. जनतेने काँग्रेसला नाकारले असून आगामी काळात युवा स्वाभिमान पार्टी अधिक बळकट होणार आहे.
प्रकाश साबळे यांनी सांगितले की, आमदार रवि राणा हे जननायक आणि कार्यसम्राट नेतृत्व आहे. त्यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष केला आहे. त्यांच्या कार्याने प्रेरित होऊन मी युवा स्वाभिमान पार्टीत प्रवेश केला आहे. ही पार्टी सामान्य कार्यकर्त्यांना न्याय, सन्मान आणि नेतृत्वाची संधी देणारी पार्टी आहे. आगामी काळात पक्ष संघटना बळकट करण्यासाठी मी पूर्ण ताकदीने काम करणार आहे. प्रकाश साबळे यांची जिल्हाध्यक्ष, सोनाली नवले यांची महिला जिल्हाध्यक्षा, संजय भारसाकळे यांची दर्यापूर विधानसभा प्रमुख, अजय देशमुख यांची जिल्हा कार्याध्यक्ष यांच्यासह इतरांच्या नियुक्ती या कार्यक्रमात जाहीर करण्यात आल्या. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नीळकंठ कात्रे, ॲड. सागर देशमुख महाराज, सुनील राणा, जयंतराव वानखडे, शैलेंद्र कस्तुरे, कमलकिशोर मालानी, ॲड. नंदेश अंबाडकर यांच्यासह पक्षाचे नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.