हिरवाईचा भ्रम की पर्यावरणाचा समतोल?

जैवविविधतेचा वाढता ऱ्हास

    दिनांक :25-Jun-2026
Total Views |
विधी शर्मा

नागपूर,
tree plantation issues पावसाळा सुरू होताच नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण मोहिमा राबवल्या जातात. रस्त्यांचे दुभाजक, उद्याने आणि सार्वजनिक ठिकाणे हिरवाईने नटलेली दिसतात. मात्र या वाढत्या हरित आच्छादनामागे जैवविविधतेचा ऱ्हास लपला असल्याची गंभीर चिंता पर्यावरणतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. स्थानिक वृक्षप्रजातींच्या जागी विदेशी आणि शोभेच्या वृक्षांची वाढती लागवड शहराच्या पर्यावरणीय संतुलनासाठी धोकादायक ठरत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
 

biodiversity loss India, urban tree plantation issues 
- स्थानिक वृक्षप्रजातींना विसर पडतोय
डॉ. आंबेडकर महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. एस. आर. सोमकुवर यांच्या मते, शहरीकरण, रस्ते रुंदीकरण आणि नियोजित वृक्षारोपणामुळे वरुणसारख्या अनेक स्थानिक वृक्षप्रजाती दुर्मिळ होत आहेत. त्यांच्या जागी गुलमोहर, अशोक, फॉक्सटेल पाम, तबेबुया यांसारख्या शोभेच्या आणि विदेशी प्रजातींना प्राधान्य दिले जात आहे.
तज्ज्ञांच्या मते, विदेशी प्रजातींमुळे परिसर हिरवागार दिसत असला तरी त्यातून स्थानिक पक्षी, कीटक आणि इतर जीवांना आवश्यक अन्न व अधिवास मिळत नाही. परिणामी जैवविविधतेची साखळी कमकुवत होत असून भविष्यात ‘पर्यावरणीय वाळवंट’ निर्माण होण्याचा धोका वाढत आहे.
 
 
नाग नदी परिसरातील बदल चिंताजनक
ज्येष्ठ वनस्पतिशास्त्रज्ञ दिलीप चिंचमलतपुरे यांनी नाग नदीचे उदाहरण देत सांगितले की, सांडपाण्याच्या नाल्यात रूपांतर झाल्यामुळे नदीतील अनेक स्थानिक जलचर प्रजातींचा ऱ्हास झाला आहे. शहरातील चिमण्या, पोपट, कावळे, खारी तसेच परागीभवन करणाऱ्या अनेक कीटकांची संख्याही हळूहळू कमी होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
 
 
शाश्वत विकासासाठी स्थानिक प्रजातींची गरज
पर्यावरणवादी अलका चतुर्वेदी यांनी अर्जुन, कडुनिंब, कदंब, पळस, मोह, वड, पिंपळ, उंबर, करंज, बकुळ आणि कुसुम यांसारख्या स्थानिक वृक्षप्रजातींच्या लागवडीला प्राधान्य देण्याची गरज व्यक्त केली. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर या प्रजाती पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकतात, असे त्यांनी सांगितले.
"वृक्षारोपणामुळे हिरवाई वाढू शकते, मात्र जैवविविधता आपोआप वाढत नाही. नागपूरमधील समृद्ध जैवविविधता ही नैसर्गिकरित्या विकसित झालेली आहे. विविध वनस्पती प्रजाती टिकवण्यासाठी काही जागा निसर्गासाठी खुल्या ठेवणे आणि स्थानिक प्रजातींच्या संवर्धनाला प्राधान्य देणे आवश्यक आहे."
- प्राची माहूरकर,
पर्यावरण विषयक अभ्यासक व सल्लागार
पर्यावरणतज्ज्ञांच्या मते, केवळ हरित आच्छादन वाढविणे हा पर्यावरण संवर्धनाचा अंतिम उद्देश असू शकत नाही. स्थानिक जैवविविधतेचे संरक्षण, संवर्धन आणि नैसर्गिक अधिवासांचे जतन हेच शाश्वत व पर्यावरणपूरक शहरी विकासाचे खरे मापदंड आहेत.