गोंदिया,
childbirth-on-the-duronto-express : जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र काटी अंतर्गत उपकेंद्र मरारटोला येथे कार्यरत असलेल्या आरोग्य सेविका राजश्री भोंडे (नेवारे) यांनी प्रसंगावधान, वैद्यकीय कौशल्य आणि अपार धैर्याच्या बळावर धावत्या रेल्वेत एका गर्भवती महिलेची सुरक्षित प्रसूती करून माता आणि नवजात बालकाचा जीव वाचवला. त्यांच्या या कार्याची सर्वत्र प्रशंसा होत असून त्यांना ‘आरोग्य देवदूत’ अशी गौरवपूर्ण उपाधी मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २४ जून रोजी सकाळच्या सुमारास नागपूर-मुंबई दुरांतो एक्सप्रेस जळगाव स्थानक ओलांडून पुढे धावत असताना ट्रेनमधील एका गर्भवती महिलेला अचानक तीव्र प्रसूतीकळा सुरू झाल्या. वेदनांची तीव्रता वाढत असल्याने तिची अवस्था चिंताजनक बनली. पुढील स्थानक येण्यास बराच अवधी असल्यामुळे तिचे नातेवाईक आणि सहप्रवासीही हतबल झाले होते. रेल्वेच्या वेगाबरोबरच चिंतेचाही वेग वाढत होता. अशा बिकट परिस्थितीत अनेक जण गोंधळून गेले असताना, त्याच डब्यात प्रवास करणाऱ्या राजश्री भोंडे यांनी परिस्थितीचे गांभीर्य क्षणात ओळखले. आरोग्य सेविकेच्या नात्याने त्यांनी आपल्या कर्तव्याला प्राधान्य देत तातडीने मदतीसाठी पुढाकार घेतला. धावत्या रेल्वेत प्रसूती करणे ही अत्यंत जोखमीची बाब. ना आवश्यक वैद्यकीय उपकरणे, ना प्रसूती कक्ष, ना डॉक्टरांची टीम. मात्र, संकटसमयी अनुभवच सर्वात मोठे साधन ठरते. राजश्री भोंडे यांनी आपल्या प्रदीर्घ सेवाकाळातील अनुभव, प्रशिक्षण आणि आत्मविश्वासाच्या जोरावर परिस्थिती हाताळण्यास सुरुवात केली. सहप्रवाशांच्या मदतीने त्यांनी महिलेसाठी आवश्यक गोपनीयता आणि सुरक्षिततेची व्यवस्था केली.
प्रसूतीची प्रक्रिया काळजीपूर्वक पार पाडत त्यांनी कोणतीही वैद्यकीय गुंतागुंत निर्माण होऊ न देता महिलेची यशस्वी प्रसूती केली. काही क्षणांपूर्वी चिंतेचे सावट असलेल्या डब्यात नवजात बालकाच्या रडण्याचा मधुर स्वर घुमला आणि वातावरणात दिलासा व आनंदाची लहर पसरली. प्रसूतीनंतर तात्काळ रेल्वे प्रशासनाशी संपर्क साधण्यात आला. परिस्थितीची माहिती मिळताच चाळीसगाव रेल्वे स्थानकावर आरोग्य यंत्रणा आणि रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आली. रेल्वेगाडी स्थानकावर पोहोचताच माता आणि नवजात बालकाला १०८ रुग्णवाहिकेद्वारे जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले. प्राथमिक तपासणीनंतर दोघांचीही प्रकृती स्थिर आणि समाधानकारक असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
आरोग्य विभागाकडून विशेष गौरव
राजश्री भोंडे यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत गोंदिया जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत गोल्हार, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अरविंदकुमार वाघमारे तसेच माता-बाल संगोपन अधिकारी डॉ. रोशन राऊत यांनी त्यांचे विशेष अभिनंदन करून त्यांनी भोंडे यांच्या कार्याला आरोग्य विभागासाठी अभिमानास्पद आणि प्रेरणादायी उदाहरण असे संबोधले.