नसरापूर प्रकरणात नराधम कांबळेच दोषी!

नसरापूर प्रकरणात न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

    दिनांक :25-Jun-2026
Total Views |
पुणे,
Court verdict in the Nasrapur case संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या नसरापूर प्रकरणात अखेर महत्त्वाचा निकाल समोर आला आहे. पुण्यातील विशेष न्यायालयाने आरोपी भीमराव कांबळे याला दोषी ठरवत महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. या निकालामुळे गेल्या अनेक आठवड्यांपासून सुरू असलेल्या सुनावणीला पूर्णविराम मिळाला आहे.१ मे २०२६ रोजी नसरापूर परिसरात घडलेल्या या धक्कादायक घटनेने राज्यभर संतापाची लाट उसळली होती. साडेतीन वर्षांची चिमुरडी अचानक बेपत्ता झाल्यानंतर काही वेळातच तिचा मृतदेह आढळून आला. प्राथमिक तपासात तिच्यावर अत्याचार करून हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला होता.
 
 
 
kamnle
 
घटनेनंतर पुणे ग्रामीण पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हाती घेतली. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुरावे आणि स्थानिक माहितीच्या आधारे संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी या प्रकरणात अत्यंत वेगाने तपास पूर्ण करत तब्बल १२०० पानी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते.तपासादरम्यान न्यायवैद्यकीय अहवाल, डीएनए नमुने, घटनास्थळावरील पुरावे आणि साक्षीदारांचे जबाब या सर्वांचा बारकाईने अभ्यास करण्यात आला. पोलिसांनी आरोपीकडून घटनास्थळाची पुनर्निर्मिती देखील करून घेतली होती. या सर्व वैज्ञानिक पुराव्यांमुळे तपास अधिक मजबूत झाला. न्यायालयीन सुनावणीदरम्यान सीसीटीव्ही फुटेज हा महत्त्वाचा पुरावा ठरला. फुटेजमध्ये आरोपी भीमराव कांबळे चिमुरडीसोबत घटनास्थळाकडे जाताना दिसत होता, तर काही वेळाने तो एकटाच परतताना आढळला.
सुरुवातीला आरोपीने फुटेजमधील व्यक्ती आपण नसल्याचा दावा केला. मात्र, व्हिडिओ झूम करून दाखवल्यानंतर त्याचा दावा कमकुवत ठरला.स्वतःचा बचाव करताना आरोपीने घटनेच्या दिवशी घडलेली वेगळी कहाणी न्यायालयात मांडली. मात्र, सादर करण्यात आलेले पुरावे, तांत्रिक माहिती आणि साक्षीदारांच्या जबाबांमुळे न्यायालयाने आरोपीविरोधातील आरोप सिद्ध झाल्याचे मान्य केले.या घटनेनंतर नसरापूरसह पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी आंदोलन झाले होते. ग्रामस्थांनी रस्ता रोको करत कठोर कारवाईची मागणी केली होती. पुण्यातील नवले पूल परिसरातही या घटनेविरोधात मोठे आंदोलन करण्यात आले होते.आज न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे पीडित कुटुंबाला काही प्रमाणात न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाने पुन्हा एकदा महिलांवरील आणि लहान मुलांवरील अत्याचाराच्या घटनांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.