आप’च्या माजी उमेदवाराच्या मृत्यूने खळबळ

    दिनांक :25-Jun-2026
Total Views |
राजकोट,
Death of former AAP candidate गुजरातमधील राजकोट येथे एका २३ वर्षीय तरुणीचा फ्लॅटमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मृत तरुणीची ओळख नंदिनी बोसमिया अशी झाली असून, ती आम आदमी पक्षाची माजी उमेदवार होती. २२ जून रोजी उघडकीस आलेल्या या घटनेनंतर आत्महत्या की हत्या, यावरून मोठी चर्चा सुरू झाली आहे.पोलिसांच्या माहितीनुसार, गोंडल चौक परिसरातील आगमन रेसिडेन्सीमधील एका फ्लॅटमध्ये रविवारी संध्याकाळी नंदनीचा मृतदेह आढळून आला. प्राथमिक स्तरावर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, सर्व बाजूंनी तपास सुरू आहे.
 
 
 
नंदनी बोसमिया
नंदनी बोसमिया मूळची जेतपूर तालुक्यातील नवगड येथील रहिवासी होती. ती राजकोटमध्ये एमआर म्हणून काम करत होती. गेल्या काही काळापासून ती जुनागढमधील अस्लम समा नावाच्या तरुणासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. मात्र तिच्या कुटुंबीयांनी या मृत्यूप्रकरणी अस्लमवर गंभीर संशय व्यक्त केला आहे.नंदनीचे वडील आनंद बोसामिया यांनी दावा केला की, अस्लम विवाहित असूनही तो नंदनीसोबत राहत होता. या नात्यावरून दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. अस्लमकडून नंदनीला मारहाण होत असल्याचाही आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
 
कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, घटनेच्या दोन दिवस आधी नंदनी आणि अस्लममध्ये मोठा वाद झाला होता. त्यानंतर ती काही काळ एका मानलेल्या भावाकडे राहायला गेली होती. मात्र नंतर ती पुन्हा फ्लॅटवर परतली. घटनेच्या दिवशी नंदनीने फोन न उचलल्याने कुटुंबीयांना संशय आला. त्यांनी एका ओळखीच्या व्यक्तीला फ्लॅटवर पाठवले असता, नंदनीचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला.या प्रकरणात कुटुंबीयांनी अनेक संशयास्पद बाबी समोर आणल्या आहेत. फ्लॅटच्या मुख्य दरवाजाची कडी केवळ वरून लावलेली होती, तर मागील बाल्कनीचा दरवाजा उघडा असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे हा आत्महत्येचा प्रकार नसून नियोजित हत्या असू शकते, असा आरोप त्यांनी केला आहे.