काराकास,
Earthquake in Venezuela उत्तर-मध्य व्हेनेझुएलामध्ये झालेल्या दोन शक्तिशाली भूकंपांनी संपूर्ण देश हादरून गेला आहे. अवघ्या काही सेकंदांच्या अंतराने बसलेल्या या धक्क्यांमुळे अनेक शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. पहिला भूकंप 7.1 तीव्रतेचा होता, तर त्यानंतर काही क्षणांतच 7.5 तीव्रतेचा दुसरा जोरदार धक्का बसला. या दुहेरी हादऱ्यामुळे राजधानी कॅराकससह अनेक भागांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.भूकंपानंतर सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओंमध्ये विध्वंसाचे धक्कादायक दृश्य दिसत आहेत. अनेक बहुमजली इमारतींचे काही भाग कोसळले असून रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात ढिगारा पसरलेला आहे. धुळीचे प्रचंड लोट, लोकांची आरडाओरड आणि जीव वाचवण्यासाठी सुरू असलेली धावपळ यामुळे परिस्थितीची भीषणता स्पष्ट होत आहे.
कॅराकस, ग्वायरा आणि व्हॅलेन्सिया या शहरांमध्ये सर्वाधिक नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. अनेक भागांमध्ये इमारतींना तडे गेले असून काही ठिकाणी संपूर्ण संरचना जमीनदोस्त झाली आहे. बचाव पथके, पोलीस आणि स्थानिक प्रशासन तातडीने मदतकार्य करत असून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचा शोध सुरू आहे. भूकंपाचे धक्के केवळ व्हेनेझुएलापुरते मर्यादित राहिले नाहीत. शेजारील कोलंबियामधील बोगोटा येथेही भूकंपाचे धक्के जाणवले. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली. काही भागांतील वीजपुरवठा आणि इंटरनेट सेवा खंडित झाली असून वाहतूक व्यवस्थेवरही परिणाम झाला आहे. दरम्यान, मायकेतिया आंतरराष्ट्रीय विमानतळावरील उड्डाणे तात्पुरती स्थगित करण्यात आली आहेत. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून आफ्टरशॉक्सची शक्यता लक्षात घेता सुरक्षित ठिकाणी राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. मृतांचा आणि जखमींचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.