व्हेनेझुएलात भूकंपाचा मृत्यूतांडव...हजारांवर ठार

    दिनांक :25-Jun-2026
Total Views |
कारकास,
Earthquake's deadly havoc in Venezuela दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएलामध्ये झालेल्या शक्तिशाली दुहेरी भूकंपामुळे संपूर्ण देशात भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. अवघ्या एका मिनिटाच्या आत 7.1 आणि 7.5 तीव्रतेचे दोन मोठे धक्के बसल्याने राजधानी कॅराकस सहित अनेक शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर विध्वंस झाला आहे. अनेक इमारती, घरे आणि व्यावसायिक संकुले जमीनदोस्त झाल्याची माहिती समोर आली असून हजारो लोक मृत्युमुखी पडल्याची भीती व्यक्त केली जात आहे.भूकंपानंतर काराकाससह पश्चिम भागातील अनेक परिसरांमध्ये प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. अचानक आलेल्या जोरदार धक्क्यांमुळे नागरिक घराबाहेर धावत सुटले. अनेक बहुमजली इमारतींना मोठे तडे गेले, तर काही इमारती पूर्णपणे कोसळल्या. रस्त्यांवर ढिगारा, धुळीचे लोट आणि नागरिकांची धावपळ अशी भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे.
 
 

Earthquake 
 
स्थानिक प्रशासनाने युद्धपातळीवर मदतकार्य सुरू केले असून बचाव पथके ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचा शोध घेत आहेत. रुग्णालयांमध्ये जखमींची संख्या झपाट्याने वाढत असून वैद्यकीय यंत्रणेवर मोठा ताण पडला आहे. अनेक डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना अतिरिक्त पाळ्या करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. भूकंपानंतर देशाच्या कार्यवाहक राष्ट्रपती डेल्सी रॉड्रिग्ज यांनी राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली. त्यांनी नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन करत सरकार सर्वतोपरी मदत करत असल्याचे सांगितले. अधिकृत मृतांचा आकडा अद्याप स्पष्ट करण्यात आलेला नसला तरी जीवितहानी मोठी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
 
 
 
दरम्यान, आंतरराष्ट्रीय मदतीसाठी अनेक देश पुढे सरसावले आहेत. अमेरिकेसह विविध देशांनी मदत आणि बचाव कार्यासाठी सहकार्य देण्याची तयारी दर्शवली आहे. प्रशासनाने नागरिकांना नुकसानग्रस्त भागांपासून दूर राहण्याचे आणि सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे. भूकंपाचा परिणाम वाहतूक आणि सार्वजनिक सेवांवरही झाला आहे. अनेक भागांतील वीजपुरवठा आणि इंटरनेट सेवा विस्कळीत झाली असून मायकेतिया येथील प्रमुख विमानतळ तात्पुरता बंद करण्यात आला आहे. बचावकार्य सुरू असताना मृतांचा आणि जखमींचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.