नवी दिल्ली,
Emergency in the 9th-grade textbook राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (NCERT) ने शालेय शिक्षणाच्या अभ्यासक्रमात महत्त्वपूर्ण बदल करत नववी इयत्तेच्या सामाजिक शास्त्राच्या पुस्तकात आणीबाणीचा इतिहास समाविष्ट केला आहे. भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील सर्वाधिक चर्चिल्या गेलेल्या घटनांपैकी एक असलेल्या आणीबाणीची माहिती विद्यार्थ्यांना आता लहान वयातच मिळणार आहे.यापूर्वी आणीबाणीचा विषय मुख्यतः अकरावी आणि बारावीच्या राज्यशास्त्राच्या पुस्तकांपुरता मर्यादित होता. मात्र, नव्या बदलांनुसार नववीच्या विद्यार्थ्यांनाही या काळातील राजकीय घडामोडी, शासनाचे निर्णय आणि त्यांचे परिणाम यांचा अभ्यास करता येणार आहे. २५ जून १९७५ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केली होती. जवळपास २१ महिने देश या परिस्थितीत राहिला होता.

एनसीईआरटीच्या 'अंडरस्टँडिंग सोसायटी: इंडिया अँड बियॉन्ड' किंवा 'नवविच्य' या पुस्तकात लोकशाहीसमोरील आव्हाने या प्रकरणात आणीबाणीचा स्वतंत्र उल्लेख करण्यात आला आहे. या काळात नागरिकांच्या मूलभूत अधिकारांवर निर्बंध कसे आले, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर कशा मर्यादा आल्या आणि लोकशाही संस्थांवर त्याचा कसा परिणाम झाला, हे विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात येणार आहे. तसेच जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनाचाही या धड्यात समावेश आहे. नवीन अभ्यासक्रम राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP) आणि राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यानुसार तयार करण्यात आला आहे. यामध्ये भारतीय संस्कृती, परंपरा आणि ज्ञानव्यवस्थेला अधिक महत्त्व देण्यात आले आहे. त्यामुळे युरोप-केंद्रित काही विषयांना कमी प्राधान्य देत भारतीय इतिहास आणि सांस्कृतिक वारशावर अधिक भर देण्यात आला आहे.
नव्या पुस्तकात विद्यार्थ्यांना प्राचीन संस्कृतींचा विस्तृत परिचय करून देण्यात येणार आहे. हडप्पा, मेसोपोटेमिया, इजिप्त आणि चीन यांसारख्या संस्कृतींचा इतिहास, त्यांचा भौगोलिक विस्तार आणि सामाजिक रचना यांचा अभ्यास विद्यार्थ्यांना करता येईल. यासोबतच सुमेरियन संस्कृतीतील सिंचन व्यवस्था, स्थापत्यकला आणि सामाजिक जीवनाबद्दलही माहिती देण्यात आली आहे. या बदलाचा उद्देश विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकापुरते ज्ञान न देता समाज, इतिहास, भूगोल आणि लोकशाही यांचे व्यावहारिक आकलन करून देणे हा आहे. दैनंदिन जीवनाशी जोडलेल्या उदाहरणांतून भारतीय ज्ञानपरंपरेची ओळख करून देण्याचाही प्रयत्न करण्यात आला आहे. पंचमहाभूतांची संकल्पना मांडत निसर्ग आणि मानवी जीवनातील संबंध स्पष्ट करण्यात आले आहेत. याशिवाय, ‘भूस्खलन’ या धड्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नैसर्गिक आपत्तींबद्दल माहिती दिली जाणार आहे. भूस्खलनाची कारणे, त्याचे परिणाम आणि अशा आपत्कालीन परिस्थितीत घ्यायची काळजी याबाबतही सविस्तर मार्गदर्शन या पुस्तकातून विद्यार्थ्यांना मिळणार आहे.