मुंबई,
India vs Ireland match भारत आणि आयर्लंड यांच्यातील बहुप्रतिक्षित टी-20 मालिका 26 जूनपासून सुरू होत आहे. दोन सामन्यांच्या या मालिकेकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले असून, भारतीय संघासाठी हा दौरा विशेष महत्त्वाचा मानला जात आहे. कारण या मालिकेत श्रेयस अय्यर यांच्या नेतृत्वाखाली भारत नव्या अध्यायाची सुरुवात करणार आहे. याशिवाय युवा खेळाडू वैभव सूर्यवंशी याच्या संभाव्य पदार्पणाची सर्वाधिक चर्चा रंगली आहे. वैभव सूर्यवंशीला या मालिकेत पदार्पणाची संधी मिळाल्यास तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात पदार्पण करणाऱ्या खेळाडूंमध्ये नवा विक्रम प्रस्थापित करू शकतो. त्यामुळे चाहत्यांमध्ये त्याच्याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. भारत आणि आयर्लंड यांच्यातील दोन्ही सामने बेलफास्टमधील सिव्हिल सर्व्हिस क्रिकेट क्लबच्या मैदानावर खेळवले जाणार आहेत. मालिकेतील पहिला सामना 26 जून रोजी होणार असून दुसरा सामना 28 जूनला रंगणार आहे.

आयर्लंडच्या स्थानिक वेळेनुसार दोन्ही सामने दुपारी 1.30 वाजता सुरू होतील. टॉस दुपारी 1 वाजता होईल. भारतीय वेळेनुसार सामने सायंकाळी 6 वाजता सुरू होतील, तर टॉस 5.30 वाजता पार पडेल. त्यामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांना संध्याकाळी थरारक लढतीचा आनंद घेता येणार आहे.दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड आकडेवारी पाहिली तर भारताचे पूर्ण वर्चस्व दिसून येते. 2009 पासून आतापर्यंत दोन्ही संघ टी-20 फॉरमॅटमध्ये 8 वेळा आमनेसामने आले असून सर्व 8 सामने भारताने जिंकले आहेत. आयर्लंडला अद्याप भारताविरुद्ध पहिल्या विजयाची प्रतीक्षा आहे.
भारत-आयर्लंड मालिकेचे थेट प्रक्षेपण भारतात सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येणार आहे. त्यामुळे घरबसल्या चाहत्यांना या मालिकेतील प्रत्येक क्षण अनुभवता येईल.भारतीय संघात कर्णधार श्रेयस अय्यरसोबत अक्षर पटेल, इशान किशन, संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, वैभव सूर्यवंशी, वॉशिंग्टन सुंदर, शिवम दुबे, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग, रवी बिष्णोई, प्रिन्स यादव, हर्षित राणा आणि सूर्यांश शेडगे यांचा समावेश आहे.तर आयर्लंड संघाचे नेतृत्व लॉर्कन टकर करणार आहे. संघात जॉर्ज डॉकरेल, स्टीफन दोहनी, हॅरी टॅक्टर, गॅरेथ डेलानी, बेन कॅलिटज, टीम टॅक्टर, रॉस अडेर, मॅथ्यू हम्फ्रेस, गोविन होए, लियाम मॅकार्थी, रुबेन विल्सन, जय मुंद्रा आणि मॅथ्यू होलार्ड यांचा समावेश आहे. भारत आपला विजयी रेकॉर्ड कायम राखणार की आयर्लंड इतिहास घडवणार, याकडे आता संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष लागले आहे.