56 लाख शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज! प्रतिक्षा संपली…येणार कर्जमाफीचा मॅसेज

    दिनांक :25-Jun-2026
Total Views |
मुंबई
Ahilyadevi Holkar Yojana राज्यात शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीला वेग आला असून लवकरच पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीबाबत संदेश (एसएमएस) पाठवले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळण्याची शक्यता असून सरकारकडून त्याची तयारी युद्धपातळीवर सुरू असल्याचे चित्र आहे.
 

Ahilyadevi Holkar Yojana 
विधान परिषदेत बुधवारी बोलताना सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी योजनेच्या अंमलबजावणीची सद्यस्थिती स्पष्ट केली. राज्य सरकारने 2 जून 2026 रोजी मंत्रिमंडळ बैठकीत या योजनेला मान्यता दिली असून थकबाकीदार शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणे तसेच नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सरकारच्या धोरणानुसार 30 सप्टेंबर 2025 पर्यंतचे दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात येणार आहे. त्यापेक्षा जास्त कर्ज असलेल्या शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र वन टाईम सेटलमेंट (OTS) योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून संबंधित शेतकऱ्यांना बँकांशी समन्वय साधून दिलासा देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच थकबाकीदार शेतकरी पुन्हा कर्जपात्र ठरणार असल्याने शेती अर्थव्यवस्थेला गती मिळेल, असा सरकारचा दावा आहे.
या योजनेच्या अंमलबजावणीसाठी उच्चस्तरीय मंत्रिगट आणि उपसमिती कार्यरत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली या समितीचा नियमित आढावा घेतला जात आहे. उपमुख्यमंत्री, कृषी, सहकार, महसूल आणि संबंधित विभागांचे मंत्री या प्रक्रियेत सहभागी आहेत. योजनेचे निकष, अटी आणि शर्तींमध्ये आवश्यक बदल करण्याबाबतही या समितीत चर्चा सुरू असल्याची माहिती आहे.
 
 
दरम्यान, माजी कर्जमाफी Ahilyadevi Holkar Yojana योजनांतील लाभार्थ्यांनाही नव्या योजनेचा फायदा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेतील सुमारे 12.71 लाख शेतकऱ्यांचा यात समावेश होऊ शकतो, अशी चर्चा शासनस्तरावर सुरू आहे. या संदर्भातील अंतिम निर्णय लवकरच जाहीर होण्याची अपेक्षा आहे.शेतकरी संघटनांकडून उपस्थित करण्यात आलेल्या विविध आक्षेपांवरही शासन पातळीवर विचारविनिमय सुरू असून योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक ती पावले उचलली जात असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे आगामी काळात राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही कर्जमाफी योजना महत्त्वाचा आर्थिक दिलासा ठरणार असल्याचे मानले जात आहे.