कोलकाता,
Kolkata Taratala construction building fell पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे बुधवारी मोठी दुर्घटना घडली. ताराताला परिसरातील बांधकाम सुरू असलेल्या एका विशाल गोदामाचे छत अचानक कोसळल्याने किमान आठ कामगारांचा मृत्यू झाला, तर २० जण गंभीर जखमी झाले आहेत. अद्याप १५ हून अधिक कामगार ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.प्राथमिक माहितीनुसार, गेल्या दीड वर्षांपासून या गोदामाचे बांधकाम सुरू होते. बुधवारी दुपारी सुमारे १२:०७ वाजण्याच्या सुमारास अचानक संपूर्ण छत कोसळले. अपघाताच्या वेळी सुमारे ४० कामगार आत काम करत होते. दुर्घटना इतकी भीषण होती की, काही क्षणांत संपूर्ण परिसरात धुळीचे ढग पसरले आणि एकच गोंधळ उडाला.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे २० हजार चौरस फूट क्षेत्रफळाच्या या गोदामात अंतर्गत भिंती नसल्याने संपूर्ण भार मुख्य लोखंडी तुळयांवर होता. अतिरिक्त वजनाचा दबाव वाढल्याने अनेक बीम वाकल्या आणि अखेर संपूर्ण रचना कोसळली. घटनेनंतर नागरी संरक्षण, NDRF, अग्निशमन दल, लष्कर आणि कोलकाता पोलिसांनी संयुक्तपणे बचाव मोहीम हाती घेतली.जड काँक्रीट आणि लोखंडी बीम हटवण्यासाठी मोठ्या क्रेनसह ५० टन क्षमतेची हायड्रॉलिक क्रेन घटनास्थळी तैनात करण्यात आली. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या काही कामगारांचा आवाज ऐकू आल्याची माहिती बचाव पथकाने दिली. त्यामुळे स्निफर डॉग्सच्या मदतीने शोधमोहीम अधिक वेगाने सुरू आहे. अडकलेल्या कामगारांपर्यंत पाणी आणि ऑक्सिजन पोहोचवण्याचे प्रयत्नही सुरू आहेत. जखमींना तातडीने SSKM रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मृतांमध्ये कृष्णा चौधरी, रोहित चौधरी आणि राहुल चौधरी यांची ओळख पटली असून इतर काहींची ओळख अद्याप पटलेली नाही.
स्थानिक नागरिकांनी धक्कादायक दावा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, बुधवारी सकाळपासूनच इमारतीची रचना अस्थिर वाटत होती. काही कामगारांनी याबाबत चिंता व्यक्त केली होती. मात्र, काही वेळातच पाच मजली उंचीच्या या संरचनेचा मोठा भाग लोखंडी बीमसह कोसळला.या प्रकरणी पर्यवेक्षक सय्यद मोहम्मद गुलजार, कामगार पुरवठादार मोहम्मद अताउल आणि सुभाष चौधरी यांना अटक करण्यात आली आहे. तसेच कंत्राटदार मोहम्मद असगर यांच्या भूमिकेचीही चौकशी सुरू आहे.मुख्यमंत्र्यांनी घटनास्थळी भेट देत बचावकार्याचा आढावा घेतला. प्राथमिक तपासात इमारतीच्या आराखड्यात गंभीर त्रुटी असल्याचे समोर आले आहे. कोलकाता महानगरपालिकेच्या अभियंत्यांनीही आराखडा सदोष असल्याचे स्पष्ट केले. सविस्तर अहवाल आल्यानंतर गोदाम मालकांवर कठोर कारवाई होणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.