छत्रपती संभाजीनगर,
Maharashtra police promotion 2026 राज्याच्या गृह विभागाने मंगळवारी मोठा प्रशासकीय फेरबदल जाहीर करत पोलिस निरीक्षक पदावरून उपअधीक्षक (डीवायएसपी) आणि सहायक पोलिस आयुक्त (एसीपी) पदावर पदोन्नती तसेच बदल्यांचे आदेश निर्गमित केले आहेत. राज्यभरात २२४ पोलिस निरीक्षकांना पदोन्नती देण्यात आली असून ११५ अधिकाऱ्यांच्या बदल्याही करण्यात आल्या आहेत. या निर्णयाचा प्रभाव छत्रपती संभाजीनगर शहर आणि ग्रामीण पोलिस दलावरही स्पष्टपणे दिसून आला असून जिल्ह्याला एकूण १२ नवे अधिकारी मिळाले आहेत, तर चार अधिकाऱ्यांची जिल्ह्याबाहेर बदली झाली आहे.
या प्रशासकीय बदलांमुळे शहर व ग्रामीण पोलिस यंत्रणेतील विविध महत्त्वाच्या पदांवर नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती होणार असून कामकाजात अधिक गतिमानता येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्हे तपास यंत्रणा अधिक सक्षम करणे तसेच प्रशासकीय कामकाज अधिक सुरळीत करण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.पदोन्नती मिळालेल्या अधिकाऱ्यांमध्ये संजय देशमुख (आर्थिक गुन्हे शाखा, ग्रामीण), दीपाली भुजबळ (मुख्यालय, लोहमार्ग), वैशाली चांदगुडे (राष्ट्रीय महामार्ग संरक्षण), स्वाती थोरात (ग्रामीण मुख्यालय), विश्वजित काईगडे (सिल्लोड उपविभाग), संजय नाळे (जात पडताळणी समिती), प्रवीण खाणापुरे (एसआयडी) आणि मजहर अली सय्यद (शहर एसीपी कार्यालय) यांचा समावेश आहे. याशिवाय चंद्रशेखर कदम आणि नरेंद्र पाडळकर यांना पदोन्नती देण्यात आली असून त्यांची नियुक्ती शहरातच कायम ठेवण्यात आली आहे.पदोन्नतीनंतर काही अधिकाऱ्यांच्या बदल्याही करण्यात आल्या असून उपअधीक्षक सतीश वाघ यांची हिंगोली येथे, किशोर चौधरी यांची पोलिस प्रशिक्षण केंद्र, नाशिक येथे, सुनिल माने यांची नांदेड येथे तर ब्रम्हदेव गावडे यांची पुणे शहर पोलिस दलात नियुक्ती करण्यात आली आहे. या बदल्यांमुळे संबंधित जिल्ह्यांमध्ये प्रशासकीय नवचैतन्य निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, ग्रामीण विभागाच्या Maharashtra police promotion 2026 उपविभागीय अधिकारी पूजा नांगरे आणि शहरातील सहायक पोलिस आयुक्त सुभाष भुजंग यांना त्यांच्या विद्यमान पदावर आणखी एका वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यांच्या कामगिरीचा विचार करून आणि प्रशासनातील सातत्य टिकवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे मानले जात आहे. या मुदतवाढीमुळे दोन्ही महत्त्वाच्या विभागांतील कामकाजाला स्थैर्य मिळणार आहे.त्याचबरोबर दत्तात्रय थोपटे यांची जात पडताळणी समितीत, तर दिनेशकुमार कोल्हे यांची अतिरिक्त अधीक्षक, सीआयडी पदावर बदली करण्यात आली आहे. या फेरबदलामुळे संबंधित विभागांमध्ये नव्या जबाबदाऱ्यांचे वाटप होणार असून प्रशासकीय यंत्रणेत नव्या ऊर्जेचा संचार होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.गृह विभागाच्या या व्यापक निर्णयामुळे राज्यातील पोलिस प्रशासनात मोठ्या प्रमाणावर फेररचना झाली असून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही नव्या अधिकाऱ्यांच्या आगमनामुळे कायदा व सुव्यवस्थेच्या कामकाजाला अधिक गती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.