मानसिक छळाला कंटाळून बुलढाण्याच्या अभियंत्याची आत्महत्या

*आ. सिद्धार्थ खरात यांनी अधिवेशनात वेधले सभागृहाचे लक्ष

    दिनांक :25-Jun-2026
Total Views |
बुलढाणा, 
engineer-commits-suicide : शहरातील मलकापूर रोड येथील रहिवासी तसेच बोईसर येथील नामांकित विराज प्रोफाईल्स स्टेनलेस स्टील कंपनीत अभियंता पदावर कार्यरत असलेले प्रदीप सुखदेव जाधव यांनी कंपनीतील कथित मानसिक छळ आणि त्रासाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मेहकरचे आ. सिध्दार्थ खरात यांनी पावसाळी अधिवेशनात याकडे सभागृहाचे लक्ष वेधून जाधव कुटुंबाला न्याय देण्याची मागणी केली आहे.
 
 
 
bul
 
 
 
प्रदीप जाधव हे गेल्या सात वर्षांपासून बोईसर येथील विराजप्रोफाईल्स कंपनीमध्ये कार्यकारी अभियंता पदावर कार्यरत होते. मात्र कंपनीचे मालक नीरज कोच्चर, सीईओ जितेंद्र प्रताप गर्ग यांच्यासह काही वरिष्ठांकडून त्यांना सातत्याने मानसिक त्रास दिला जात होता असा गंभीर आरोप कुटुंबीयांनी केला आहे. जातिवाचक शिवीगाळ, अपमानास्पद वागणूक तसेच जीवे मारण्याच्या धमया दिल्या जात असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. १९ जून रोजी प्रदीप जाधव यांना कंपनी मालकाच्या बंगल्यावर बोलावण्यात आले होते. त्या ठिकाणी सीईओसह एकूण नऊ जण उपस्थित होते. बैठकीदरम्यान प्रदीप जाधव यांच्यावर खोटे आरोप करून त्यांना मानसिक त्रास देण्यात आला. बैठकीनंतर प्रदीप जाधव थेट आपल्या फ्लॅटवर गेले आणि त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली. त्या नोटमध्ये कंपनीतील अधिकार्‍यांकडून होत असलेल्या कथित त्रासाचा उल्लेख करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर त्यांनी गळफास घेऊन जीवन संपविले. याप्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आ. सिद्धार्थ खरात यांनी केली आहे.