मुंबई
Mayank Lohar मुंबई लोकलमधील वाढती गर्दी आणि प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल ट्रेनमध्ये झालेल्या 22 वर्षीय मयंक लोहार यांच्या निर्घृण हत्येने शहरात खळबळ उडाली असून, या घटनेनंतर रेल्वे प्रवासातील सुरक्षिततेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे मागील सहा महिन्यांत लोकल ट्रेनमध्ये दुसऱ्यांदा हत्येची घटना घडल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मंगळवारी रात्री सुमारे 10.50 वाजता चर्चगेट–नालासोपारा फास्ट लोकल ट्रेनमध्ये अंधेरी आणि बोरिवली स्थानकांदरम्यान हा रक्तरंजित प्रकार घडला. फर्स्ट क्लास डब्यात पावसाचे पाणी येत असल्याने दरवाजा बंद करण्यावरून प्रवाशांमध्ये वाद निर्माण झाला होता. या किरकोळ वादातूनच परिस्थिती चिघळली आणि आरोपी रोशन सुवर्णा याने अचानक आपल्या बॅगेतील चाकू काढून मयंक लोहार यांच्यावर छाती आणि पोटावर सपासप वार केले. या हल्ल्यात मयंक गंभीर जखमी झाले.
हल्ल्यानंतर काही क्षणांतच आरोपीने धावत्या लोकलमधून उडी मारून पलायन केले. ट्रेन बोरिवली स्थानकात पोहोचताच रेल्वे अधिकारी, सरकारी रेल्वे पोलीस (जीआरपी) आणि रेल्वे संरक्षण दल (आरपीएफ) घटनास्थळी दाखल झाले. जखमी अवस्थेतील मयंक यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेनंतर रेल्वे पोलिसांनी तात्काळ हत्येचा गुन्हा दाखल करत तपासाची चक्रे फिरवली. आरोपीचा शोध घेण्यासाठी सात विशेष पथके तयार करण्यात आली होती. बोरिवली, अंधेरी, मीरा रोड आणि नालासोपारा परिसरातील सुमारे 400 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात आले. अखेर आरोपी रोशन सुवर्णा याला पनवेल परिसरातून 24 तासांच्या आत अटक करण्यात आली.
दरम्यान, या हृदयद्रावक Mayank Lohar घटनेनंतर मयंक लोहार यांच्या कुटुंबीयांनी आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा, विशेषतः फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. मयंक यांच्या बहिणीनेही संतप्त प्रतिक्रिया देत आमचे कुटुंब उद्ध्वस्त झाले असून आरोपीला तात्काळ कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली आहे.या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला असून त्यानंतर मुंबई लोकलमधील सुरक्षा व्यवस्था, गर्दीचे व्यवस्थापन आणि प्रवाशांच्या संरक्षणाबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रेल्वे प्रशासन व पोलीस यंत्रणा या प्रकरणाचा पुढील तपास करत असून शहरात या घटनेची तीव्र चर्चा सुरू आहे.