इटानगर,
Nature's fury in Arunachal अरुणाचल प्रदेशातील केयी पान्योर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. याचुली परिसरात अचानक आलेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणात हानी झाली असून, या नैसर्गिक आपत्तीत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर चार जण अद्याप बेपत्ता असल्याने चिंता वाढली आहे.बुधवारी झालेल्या जोरदार पावसानंतर अनेक भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली. पुरासोबतच मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. याचुलीकडे जाणारे सर्व प्रमुख रस्ते बंद पडले असून, अनेक भागांचा संपर्क तुटला आहे.
रस्ते बंद झाल्याने बचावकार्य मोठ्या अडचणीत आले. त्यामुळे अरुणाचल प्रदेश सरकारने तातडीने हवाई मदतीचा निर्णय घेतला. केयी पान्योर जिल्ह्यातील पुसा परिसरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी भारतीय हवाई दलाच्या मदतीने विशेष बचाव मोहीम सुरू करण्यात आली.राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान आणि जीवनावश्यक साहित्य हेलिकॉप्टरद्वारे पूरग्रस्त भागात पोहोचवण्यात आले. अत्यंत खराब हवामान आणि प्रतिकूल परिस्थिती असूनही बचाव पथके मदतकार्यात सातत्याने कार्यरत आहेत.
प्रशासनाकडून बेपत्ता नागरिकांचा शोध सुरू असून, गरज भासल्यास आणखी हवाई फेऱ्या केल्या जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या संपूर्ण बचाव मोहिमेत भारतीय हवाई दल, एसडीआरएफ आणि स्थानिक प्रशासनाची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे. पूर आणि भूस्खलनाच्या दुहेरी संकटामुळे अरुणाचल प्रदेशातील परिस्थिती गंभीर बनली असून, पुढील काही दिवस प्रशासनासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.