नागपूर,
shama-mohammed : केंद्र सरकारच्या परीक्षा व्यवस्थेवर तीव्र टीका करत काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या डॉ. शमा मोहम्मद यांनी पत्रकार परिषदेत राष्ट्रीय परीक्षा संस्था (एनटीए) बरखास्त करण्याची मागणी केली. गेल्या काही वर्षांत विविध स्पर्धा परीक्षांमध्ये सातत्याने पेपरफुटीच्या घटना घडत असून, त्यामुळे कोट्यवधी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
डॉ. मोहम्मद म्हणाल्या की, २०२४ च्या एका अहवालानुसार गेल्या दशकात देशभरात ८९ परीक्षांचे प्रश्नपत्रिका फुटल्या असून, त्याचा फटका तब्बल ६.५ कोटी उमेदवारांना बसला आहे. या प्रकरणांमुळे ४८ परीक्षांसाठी फेरपरीक्षा घ्यावी लागली, तर २२ परीक्षा रद्द करण्यात आल्या, असा दावा त्यांनी केला.
नीट-२०२६ परीक्षेचा उल्लेख करत त्यांनी प्रश्नपत्रिका फुटीच्या आरोपांवरून एनटीएच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. संसदीय स्थायी समितीच्या २०२५ च्या अहवालातही एनटीएच्या कामकाजातील त्रुटी अधोरेखित झाल्याचा दावा त्यांनी केला. २०२४ मध्ये एनटीएच्या अनेक परीक्षांमध्ये गंभीर अडचणी निर्माण झाल्यामुळे काही परीक्षा पुढे ढकलाव्या लागल्या तसेच जेईई मेनमधील काही प्रश्न रद्द करण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.
राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आलेल्या 'छात्रों की गूंज' मोहिमेचा उद्देश विद्यार्थ्यांचे प्रश्न देशासमोर मांडणे आणि केंद्र सरकारच्या कथित अपयशाकडे लक्ष वेधणे हा असल्याचे त्यांनी सांगितले.
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, पेपरफुटी रोखण्यासाठी संपूर्ण परीक्षा व्यवस्थेत आमूलाग्र सुधारणा कराव्यात आणि परीक्षा, भरती व नियुक्ती प्रक्रिया निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्यासाठी स्पष्ट वेळापत्रक जाहीर करावे, या तीन प्रमुख मागण्या डॉ. शमा मोहम्मद यांनी स्पष्ट केल्या.
पत्रकार परिषदेत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस प्रचारक अतुल लोंढे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे नागपूर शहर अध्यक्ष प्रफुल्ल गुडधे पाटील, काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या डॉ. शमा मोहम्मद, संजय महाकाळकर यांच्यासह काँग्रेसचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.