माझे लेकरू परत आले हो…

ऑपरेशन शोध-४ ठरले यशस्वी

    दिनांक :25-Jun-2026
Total Views |
छत्रपती संभाजीनगर
Operation Shodh 4 घरातून निघून गेलेल्या मुलांच्या प्रतिक्षेत दिवस-रात्र व्याकूळ झालेल्या १७ कुटुंबांच्या आयुष्यात ग्रामीण पोलिसांनी पुन्हा आनंदाचे क्षण परत आणले आहेत. राज्यभर राबविण्यात आलेल्या ‘ऑपरेशन शोध-४’ मोहिमेअंतर्गत ग्रामीण पोलिसांनी १३ मुली आणि ४ मुलांचा शोध घेऊन त्यांना सुखरूपपणे कुटुंबीयांच्या स्वाधीन केले. या यशस्वी मोहिमेमुळे अनेक कुटुंबांचे हरवलेले हास्य परतले असून तुटलेले भावनिक बंध पुन्हा जुळले आहेत.
 

Operation Shodh 4 
८ ते २३ जून या कालावधीत हरविलेल्या आणि अपहृत बालकांचा शोध घेण्यासाठी ग्रामीण पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेदरम्यान तांत्रिक विश्लेषण, सोशल मीडियावरील हालचालींचा तपास, सीसीटीव्ही फुटेजचे परीक्षण, रेल्वे आणि बसस्थानकांवरील चौकशी तसेच विविध जिल्ह्यांतील पोलिस यंत्रणांशी समन्वय साधून प्रत्येक धाग्याचा बारकाईने पाठपुरावा करण्यात आला. या प्रयत्नांमधून १७ बालकांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले.
 
 
तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, Operation Shodh 4 शोध लागलेल्या १७ बालकांपैकी ११ मुली प्रेमसंबंधांच्या प्रभावामुळे घरातून निघून गेल्या होत्या. दोन मुलींनी कौटुंबिक रागातून घर सोडले होते. मोठे शहर पाहण्याच्या आकर्षणातून तीन मुले घराबाहेर पडली होती, तर आई-वडिलांमधील सततच्या वादांना कंटाळून एका मुलाने घर सोडल्याचे निष्पन्न झाले. पोलिस अधीक्षक प्रकाश जाधव यांनी सांगितले की, घरातून निघून गेलेले मूल पुन्हा आई-वडिलांच्या कुशीत परत आणणे हा पोलिस दलासाठी सर्वांत समाधानाचा क्षण असतो.या मोहिमेदरम्यान काही प्रकरणांनी विशेष लक्ष वेधून घेतले. चिकलठाणा परिसरातील १७ वर्षीय मुलगी सोशल मीडियावर, विशेषतः इन्स्टाग्रामवर सक्रिय होती. घरातील शिस्तीच्या वातावरणाबाबत नाराजी निर्माण झाल्याने ती घरातून निघून गेली होती. पोलिसांनी तिच्या सोशल मीडिया खात्यांचा सखोल तपास करत संपर्कातील व्यक्तींची चौकशी केली. त्यातून ती पुण्यातील एका मैत्रिणीकडे असल्याचे समोर आले. समुपदेशनानंतर तिला कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले.करमाड परिसरातील १४ वर्षीय मुलगा घरातील सततच्या भांडणांमुळे मानसिक तणावाखाली होता. घर सोडल्यानंतर पोलिसांनी विविध ठिकाणी शोधमोहीम राबवून अखेर त्याला मुकुंदवाडी रेल्वे स्थानक परिसरातून शोधून काढले. त्यानंतर मुलगा आणि त्याच्या पालकांचे समुपदेशन करण्यात आले व कुटुंब पुन्हा एकत्र आणण्यात आले.
 
 
शिऊर परिसरातील १५ ते १६ वर्षे वयोगटातील तीन मित्रांनी मुंबई पाहण्याच्या उत्सुकतेतून घर सोडले होते. रेल्वे स्थानके, सीसीटीव्ही फुटेज आणि प्रवासाच्या संभाव्य मार्गांचा मागोवा घेत पोलिसांनी दादर रेल्वे स्थानक परिसरातून तिघांनाही ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना सुखरूपपणे त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.
याच परिसरातील एका १७ वर्षीय मुलीने Operation Shodh 4 अभ्यासाच्या कारणावरून आईसोबत झालेल्या वादानंतर घर सोडले होते. नातेवाईक आणि मित्रपरिवाराकडे चौकशी करत पोलिसांनी तिचा शोध घेतला. ती एका नातेवाईकाकडे सुरक्षित असल्याचे आढळून आले. आवश्यक समुपदेशनानंतर तिलाही कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले.ऑपरेशन शोध-४ मोहिमेच्या माध्यमातून ग्रामीण पोलिसांनी केवळ हरविलेल्या बालकांचा शोध घेतला नाही, तर अनेक कुटुंबांना पुन्हा एकत्र आणत सामाजिक जबाबदारीचेही दर्शन घडविले आहे. वाढता सोशल मीडिया प्रभाव, कौटुंबिक तणाव आणि भावनिक अस्थिरता यांसारख्या कारणांमुळे अल्पवयीन मुलांकडून टोकाची पावले उचलली जात असल्याचे या प्रकरणांतून स्पष्ट झाले असून, पालकांनी मुलांशी संवाद वाढविण्याची गरजही अधोरेखित झाली आहे.