मी बोललो तरी पंगा, शांत राहिलो तरी..

    दिनांक :25-Jun-2026
Total Views |
मुंबई
Rajinikanth दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्या आगामी ‘धर्मन’ या चित्रपटाची नुकतीच अधिकृत घोषणा करण्यात आली असून, या चित्रपटाची निर्मितीकमल हासन करत आहेत. या घोषणेनिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात रजनीकांत, कमल हासन तसेच दिग्दर्शक अश्वथ मारिमुथू उपस्थित होते. या कार्यक्रमातील रजनीकांत यांचे भाषण सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर चर्चेत आले आहे.
 

Rajinikanth, Dharman Movie, 
कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच रजनीकांत यांनी सार्वजनिक व्यासपीठावर बोलताना वाढत्या वादंगाबाबत आपली चिंता व्यक्त केली. “आजकाल मी सार्वजनिक व्यासपीठावर काहीही बोललो तरी त्यावरून वाद निर्माण होतोच. त्यामुळे बोलण्यासाठी बोलावलं गेलं की मी थोडा संकोचतो. मी काहीही बोललो तरी एकतर माझी किंवा समोरच्यांची अडचण होते,” असे ते म्हणाले. त्यांनी पुढे सांगितले की, मौन पाळले तरी त्यावरूनही टीका होते आणि बोलले तरीही वाद निर्माण होतात.
त्यांनी विनोदी शैलीत लोकांच्या प्रतिक्रियांवर भाष्य करताना म्हटले की, काही जण त्यांच्या शांत राहण्यावरही टोमणे मारतात, तर काही जण त्यांच्या प्रत्येक विधानाचा वेगळा अर्थ लावतात. त्यामुळे कोणतेही वक्तव्य करताना अत्यंत सावध राहावे लागते, असे त्यांनी स्पष्ट केले.
रजनीकांत यांनी पुढे सांगितले की, “मी काहीही बोललो तरी काही लोक म्हणतात की बोलायची गरजच नव्हती, तर काही जण म्हणतात की मी बोलायलाच हवे होते. त्यामुळे मला एक गोष्ट समजली आहे की, ज्यांना आपण आवडत नाही, त्यांना आपण काहीही केलं तरी आवडणार नाही.”
दरम्यान, सोशल मीडियावर Rajinikanth  अलीकडेच रजनीकांत यांच्याबाबत विविध चर्चा आणि अफवा पसरल्या होत्या. तमिळनाडूतील राजकीय घडामोडींनंतर त्यांनी थलपती विजय यांना शुभेच्छा न दिल्याच्या मुद्द्यावरून टीका झाली होती. या पार्श्वभूमीवर त्यांनी चेन्नईतील आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिले होते. त्या वेळी त्यांनी कोणताही राजकीय किंवा वैयक्तिक हेतू नसल्याचे स्पष्ट करत, चुकीच्या अफवांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला होता.तरीही, या सर्व घडामोडींनंतर रजनीकांत यांच्या प्रत्येक वक्तव्याभोवती निर्माण होणारी चर्चा थांबण्याऐवजी अधिकच वाढताना दिसत आहे. ‘धर्मन’ चित्रपटाच्या घोषणेनिमित्त झालेल्या या कार्यक्रमामुळे त्यांच्या आगामी प्रोजेक्टसोबतच त्यांच्या सार्वजनिक वक्तव्यांवरील प्रतिक्रिया पुन्हा एकदा केंद्रस्थानी आल्या आहेत.