धाराशिव
Rohit Pawar शिवसेना (ठाकरे गट) पक्षाला नुकत्याच झालेल्या राजकीय घडामोडींमुळे मोठा धक्का बसला असून पक्षाच्या नऊ खासदारांपैकी सहा खासदारांनी बंडखोरी करत शिवसेना (शिंदे गट)मध्ये प्रवेश केला आहे. या घडामोडीनंतर राज्यातील महायुतीत शिवसेना (शिंदे गट) हा सर्वात मोठा घटक पक्ष ठरला असून त्यांच्या खासदारांची संख्या सातवरून थेट तेरा झाली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनी बंडखोर खासदारांबाबत गंभीर आरोप करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.
धाराशिव येथे माध्यमांशी संवाद साधताना रोहित पवार यांनी ‘ऑपरेशन टायगर’च्या नावाखाली शिवसेनेतील फुटीमागे आर्थिक प्रलोभनांचा वापर झाल्याचा दावा केला. फुटलेल्या सहा खासदारांना 80 ते 90 कोटी रुपयांची रोख रक्कम आणि सुमारे अडीचशे कोटी रुपयांचा विकास निधी देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. या कथित व्यवहारांमुळेच खासदारांनी पक्षांतराचा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले.यावेळी त्यांनी भाजपमधील अंतर्गत मतभेदांवरही भाष्य केले. राज्यातील भाजप आणि केंद्रातील भाजप नेतृत्वामध्ये मतभेद सुरू असल्याचा दावा करत केंद्रातील नेतृत्व हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बळ देत असल्याचे, तर राज्यातील भाजप नेतृत्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूने उभे असल्याचे त्यांनी म्हटले. फडणवीस हे शिंदे यांची राजकीय आडवणूक करत असल्याचाही आरोप त्यांनी केला.
राज्यात ‘ऑपरेशन Rohit Pawar टायगर’नंतर आता ‘ऑपरेशन तुतारी’ची चर्चा सुरू असल्याबाबत विचारले असता, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)मधून कोणताही आमदार किंवा खासदार फुटणार नसल्याचा ठाम विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला. पक्षातील सर्व लोक शरद पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काम करत असून पक्ष एकसंघ असल्याचे त्यांनी सांगितले.
याशिवाय ‘ऑपरेशन टायगर’ ही केवळ राजकीय रणनीती नसून आगामी मतदारसंघ पुनर्रचना (डी-लिमिटेशन) लक्षात घेऊन राबविले जात असलेले ‘ऑपरेशन बाजार’ असल्याचा आरोपही त्यांनी केला. राजकीय फायद्यासाठी लोकप्रतिनिधींना विविध प्रकारची प्रलोभने दिली Rohit Pawar जात असल्याचा दावा करत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.दरम्यान, रोहित पवार यांनी यापूर्वीही बंडखोर खासदारांबाबत विविध दावे केले होते. त्यांच्या नव्या आरोपांमुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांचे वातावरण निर्माण झाले असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये नवा राजकीय संघर्ष रंगण्याची चिन्हे दिसत आहेत.