नागपूर,
civic-felicitation-ceremony : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या पद्मश्री पुरस्कारप्राप्त मान्यवरांचा नागरी सत्कार रविवारी, २८ जून रोजी सायंकाळी ४ वाजता सिव्हिल लाईन्स येथील डॉ. वसंतराव देशपांडे स्मृती सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख अतिथी, तर भारताचे माजी सरन्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील.
विद्यापीठाच्या अधिसभेच्या निर्णयानुसार २०१९ नंतर पद्मश्री पुरस्कार प्राप्त झालेल्या मान्यवरांचा या समारंभात गौरव केला जाणार आहे. यात शंकर बाबा पापळकर, डॉ. रवींद्र कोल्हे, डॉ. स्मिता कोल्हे, डॉ. चंद्रशेखर मेश्राम, नामदेवराव कांबळे, डॉ. धनंजय सगदेव, डॉ. परशुराम खुणे, श्री नरकेसरी प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष डॉ. विलास डांगरे, सत्यनारायण नुवाल आणि जनार्दनपंत बोते यांचा समावेश आहे.
आरोग्य, समाजसेवा, साहित्य, आदिवासी विकास, रंगभूमी, उद्योग, शिक्षण आणि वैद्यकीय क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. पत्रकार परिषदेत कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर यांनी हा सत्कार समाजासाठी प्रेरणादायी कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांप्रती विद्यापीठाची कृतज्ञता असल्याचे सांगितले.
पत्रकार परिषदेला कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर यांच्यासह प्र-कुलगुरू डॉ. अखिलेश पेशवे, कुलसचिव डॉ. राजू हिवसे, सत्कार समितीचे अध्यक्ष ॲड. मनमोहन बाजपेयी उपस्थित होते.