पुणे,
shocking claim in Nasrapur case नसरापूर येथील चिमुरडीवरील अत्याचार आणि हत्येप्रकरणी आज न्यायालयात सुनावणीदरम्यान अत्यंत तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळाले. या प्रकरणातील दोषी आरोपी भीमराव कांबळे याला शिक्षेबाबत युक्तिवादासाठी न्यायालयात हजर करण्यात आले होते. सुनावणीदरम्यान न्यायाधीशांनी आरोपीला थेट प्रश्न विचारत त्याची भूमिका जाणून घेतली, ज्यामुळे काही काळ कोर्टातील वातावरण अधिकच गंभीर बनले. आरोपीने न्यायालयात दावा केला की, घटनेच्या दिवशी तो मुलीला खाऊ घेण्यासाठी घेऊन गेला होता. त्यावेळी अचानक तोल गेल्याने दोघेही पडल्याचा आणि त्यात मुलीला गंभीर दुखापत झाल्याचा दावा त्याने केला. हा प्रकार अपघाती असल्याचे दाखवण्याचा त्याचा प्रयत्न होता.

मात्र आरोपीचा हा दावा ऐकल्यानंतर न्यायाधीशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. न्यायालयाने स्पष्ट शब्दांत सांगितले की, या प्रकरणात सादर करण्यात आलेले पुरावे अत्यंत ठोस आहेत आणि आरोपीचा हा दावा उपलब्ध पुराव्यांशी सुसंगत नाही. न्यायाधीशांनी आरोपीला कडक शब्दांत फटकारत त्याच्या वक्तव्यावरील विसंगती अधोरेखित केली. दरम्यान या प्रकरणात आरोपी भीमराव कांबळे याच्याविरोधातील सर्व गंभीर आरोप न्यायालयात सिद्ध झाले आहेत. वैज्ञानिक पुरावे, डीएनए अहवाल, तांत्रिक तपास आणि साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे न्यायालयाने आरोपी दोषी असल्याचे आधीच स्पष्ट केले आहे. त्यानंतर आज शिक्षेच्या टप्प्यात सुनावणी पार पडली.
सुनावणीदरम्यान न्यायाधीशांनी आरोपीला थेट विचारले की, तुझ्याविरोधातील सर्व आरोप सिद्ध झाले आहेत, आता तुला काय शिक्षा द्यावी असे तुला वाटते? या प्रश्नानंतर काही क्षण कोर्टात शांतता पसरली. त्यावर आरोपीने स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करत वेगळीच भूमिका मांडली. सरकारी पक्षाने या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. विशेष सरकारी वकिलांनी हा गुन्हा अत्यंत अमानुष आणि क्रूर स्वरूपाचा असल्याचे नमूद करत फाशीच्या शिक्षेची मागणी न्यायालयासमोर ठेवली. या खटल्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून आता न्यायालय शिक्षेबाबत अंतिम निर्णय काय देणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. नसरापूर प्रकरणाने राज्यभर संतापाची लाट निर्माण केली होती आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळावा अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.