पुणे,
Siya's insistence on marrying Ketan पुण्यातील केतन अग्रवाल हत्याकांडात दिवसेंदिवस धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा केतन अग्रवाल याच्या मृत्यूप्रकरणी त्याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी पोलिसांसमोर गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती समोर आली आहे. तपासानुसार, २० वर्षीय सिया गोयल आणि २३ वर्षीय चेतन चौधरी यांच्यात मागील काही काळापासून प्रेमसंबंध होते. सिया बी.कॉमचे शिक्षण घेत असताना केक व्यवसाय सांभाळत होती, तर चेतन क्रिकेट क्षेत्रात करिअर घडवण्याच्या प्रयत्नात होता. दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला होता. मात्र सियाच्या कुटुंबाने चेतनची आर्थिक पार्श्वभूमी आपल्या तोलामोलाची नसल्याचे सांगत या नात्याला स्पष्ट विरोध केला.

यानंतर गोयल कुटुंबाने सियाचा साखरपुडा फेब्रुवारीमध्ये २५ वर्षीय केतन अग्रवाल याच्यासोबत लावला. उच्चशिक्षित आणि कुटुंबाच्या व्यवसायात सक्रिय असलेल्या केतनसोबत नोव्हेंबरमध्ये लग्न ठरले होते. पण या साखरपुड्यानंतरही सिया आणि चेतनचा संपर्क कायम होता.पोलिस तपासात उघड झाले की, सिया आणि चेतन यांनी केतनला हटवण्यासाठी अनेक दिवसांपासून कट रचला होता. याआधी परदेश दौऱ्यातही एकदा योजना आखण्यात आली होती, मात्र ती फसली. त्यानंतर १४ जून रोजीही लोहगड परिसरात प्रयत्न झाला, पण तोही अयशस्वी ठरला. अखेर १८ जून रोजी ट्रेकिंगच्या निमित्ताने केतनला लोहगडावर नेण्यात आले.
तपासानुसार, चेतन आधीच घटनास्थळी पोहोचला होता. ट्रेकदरम्यान योग्य संधी साधून सिया आणि चेतन यांनी केतनला खोल दरीत ढकलले. त्यानंतर हा अपघात असल्याचा बनाव करण्यात आला. सुरुवातीला ही घटना अपघाती मृत्यू म्हणून समोर आली होती, मात्र, केतनच्या कुटुंबीयांना सुरुवातीपासूनच संशय होता. विशेषतः केतनची बहीण संजना हिने सियाला विचारलेल्या प्रश्नांवर ती गोंधळल्याने संशय अधिक बळावला. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला. सीडीआर आणि मोबाईल लोकेशन तपासात मोठे पुरावे हाती लागले. गेल्या एका वर्षात सिया आणि चेतन यांच्यात तब्बल २००४ कॉल्स आणि ३०० तासांहून अधिक संवाद झाल्याचे समोर आले. तसेच सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयास्पद हालचाली आढळल्या. तपासात उघड झाले की, चेतनने स्वतःचा फोन दुसरीकडे ठेवून वेगळ्या मोबाईलसह लोहगड गाठले होते, जेणेकरून पोलिसांची दिशाभूल होईल. २२ जूनच्या रात्री पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने दोघांना ताब्यात घेत चौकशी केली. सुरुवातीला दोघांनी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, मात्र पुरावे समोर ठेवल्यानंतर अखेर दोघांचेही बिंग फुटले. या घटनेमुळे पुण्यात मोठी खळबळ उडाली असून पुढील तपास सुरू आहे.