कुलदीप-पंत डीलनंतर वॉर्नरची पोस्ट व्हायरल

    दिनांक :25-Jun-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Warner's post after Kuldeep-Pant deal दिल्ली कॅपिटल्समध्ये झालेल्या मोठ्या बदलांनंतर संघातील हालचालींनी क्रिकेट चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. ऋषभ पंत आणि कुलदीप यादव यांच्या डीलनंतर सोशल मीडियावर चर्चांचा पूर आला असून, याचदरम्यान डेव्हिड वॉर्नर याची एक पोस्ट विशेष चर्चेचा विषय ठरली आहे. दिल्ली कॅपिटल्सने आगामी हंगामासाठी संघरचनेत मोठे बदल करत काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. ऋषभ पंत १२ कोटी रुपयांच्या वेतन कपातीसह पुन्हा संघाचा भाग झाला आहे, तर कुलदीप यादव लखनौ सुपर जायंट्समध्ये आपला मोर्चा वळवला आहे. या घडामोडीनंतर संघाचे सह-मालक पार्थ जिंदाल यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट करत दोन्ही खेळाडूंबद्दल भावना व्यक्त केल्या.
 
 
 Kuldeep-Pant deal
 
पार्थ जिंदाल यांनी कुलदीप यादवच्या मागील पाच वर्षांतील योगदानाचे कौतुक करत त्याला पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच ऋषभ पंतच्या पुनरागमनाबद्दल आनंद व्यक्त करत, तो पुन्हा जुन्या दमदार फॉर्ममध्ये दिसेल असा विश्वासही व्यक्त केला. मात्र या पोस्टनंतर डेव्हिड वॉर्नरची प्रतिक्रिया सर्वांचे लक्ष वेधून घेणारी ठरली. वॉर्नरने हसणारा इमोजी शेअर करत सूचक शब्दांत आपली भूमिका मांडली. क्रिकेटमध्ये अशा गोष्टी सामान्य असल्याचे सांगत त्याने लिलाव प्रक्रियेत अनेक निर्णय आपल्या हातात नसतात, असे स्पष्ट केले. खेळाडूचा फॉर्म घसरला की संघ वेगळा निर्णय घेतो, पण दुसरीकडे काही संघ योग्य संधीची वाट पाहत असतात, असेही त्याने नमूद केले. वॉर्नरच्या या वक्तव्यामागे त्याचा वैयक्तिक अनुभवही असल्याचे मानले जात आहे.