गोंदिया,
gondia-railway-yard : स्थानिक रेल्वेस्थानक परिसरातील यार्ड भागात गुरुवारी सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास घडलेल्या एका दुर्दैवी घटनेने शहरात हळहळ व्यक्त होत आहे. रेल्वे रुळावर एका महिलेचा दोन भागांत विभागलेला मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून तपासाला सुरुवात केली.

प्राथमिक माहितीनुसार, मृत महिला गोंदिया शहरातील सिंधी कॉलनी परिसरातील रहिवासी असून तिची ओळख रश्मी रोशन गलानी अशी करण्यात आली आहे. स्थानिक नागरिकांनी घटनेची माहिती रेल्वे पोलिसांना दिल्यानंतर पोलिस यंत्रणा तत्काळ सक्रिय झाली. पोलिस निरीक्षक सुनील उईके यांच्या मार्गदर्शनात हेड कॉन्स्टेबल संदीप तुमराम व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी करून आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली. मृतदेह विच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला असून मृत्यूमागील नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे. या घटनेमुळे स्थानक परिसरात विविध चर्चांना उधाण आले असले तरी पोलिसांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले असून तपास पूर्ण झाल्यानंतरच घटनेबाबत अधिकृत माहिती स्पष्ट होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.