ती' बनली अनेक महिलांच्या यशोगाथेची शिल्पकार

    दिनांक :25-Jun-2026
Total Views |
विधी शर्मा

women empowerment काही व्यक्ती स्वतःच्या यशासाठी झटतात, तर काही जण आपल्या यशाचा मार्ग इतरांसाठी उजळवतात. अशाच व्यक्तिमत्त्वांपैकी एक म्हणजे अमृता अदावडे. स्वतःच्या आयुष्यातील संघर्षातून प्रेरणा घेत त्यांनी महिला आणि दिव्यांगांच्या सक्षमीकरणाचा ध्यास घेतला असून आज त्या अनेकांच्या आयुष्यात आशेचा किरण ठरत आहेत.
 

 women empowerment 
लहानपणी वडिलांचे छत्र हरपल्यानंतर आईला कठोर परिश्रम करताना पाहिले. त्याच अनुभवातून समाजातील वंचित, दुर्लक्षित आणि गरजू घटकांसाठी काम करण्याची प्रेरणा त्यांना मिळाली. नोकरीच्या निमित्ताने दिव्यांग व्यक्तींच्या संपर्कात आल्यानंतर त्यांच्या कलागुणांची जाणीव झाली आणि त्यांना योग्य व्यासपीठ मिळवून देण्याचा संकल्प त्यांनी केला.याच विचारातून ‘आपण फाउंडेशन’ची स्थापना झाली. या संस्थेच्या माध्यमातून दिव्यांगांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देणे, विविध प्रदर्शनांचे आयोजन करणे, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करणे तसेच सामाजिक उपक्रम राबविणे अशी विविध कामे सातत्याने केली जात आहेत.
महिला सक्षमीकरण हे त्यांच्या कार्याचे आणखी एक महत्त्वाचे अंग आहे. हस्तकला कौशल्य प्रशिक्षण, कायदेविषयक मार्गदर्शन, रोजगार व नोकरीसंदर्भातील मोफत सल्ला यांद्वारे त्यांनी अनेक महिलांना स्वावलंबनाचा मार्ग दाखविला आहे. आजवर १०० हून अधिक महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी त्यांनी मोलाची मदत केली आहे.
राज्य शासनाच्या ‘आमचं गाव आमचा विकास’ उपक्रमांतर्गत प्रवीण प्रशिक्षक म्हणून कार्य करताना त्यांनी वृक्षारोपण, दिव्यांगांसाठी रक्षाबंधन, सांस्कृतिक कार्यक्रम, कॅण्डल मार्च आणि प्रदर्शनांद्वारे विक्री उपक्रम अशा अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये पुढाकार घेतला. त्यांच्या या कार्याची दखल घेत विविध संस्थांनी त्यांना सन्मानितही केले आहे.
सध्या मुंबईतील एका खासगी कंपनीत मानव संसाधन विभागात कार्यरत असतानाही त्या समाजकार्याची धुरा समर्थपणे सांभाळत आहेत. दिव्यांगांनी तयार केलेल्या वस्तूंसाठी स्वतंत्र वस्तूभांडार उभारण्याचे त्यांचे स्वप्न आहे.
“एकेकाळी हाताला women empowerment काम नव्हते, अशी महिला आज स्वतःची ओळख निर्माण करत आहे, यापेक्षा मोठा आनंद दुसरा नाही,” असे त्या सांगतात. संघर्षाला सामर्थ्यात रूपांतरित करून इतरांच्या आयुष्याला नवी दिशा देणाऱ्या अमृता अदावडे या खऱ्या अर्थाने ‘जग रणरागिणीचे’ या सदरातील प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व ठरतात.