राज्यातील २२४ पोलिस निरीक्षकांना पदोन्नतीचे गिफ्ट

रखडलेल्या पदोन्नत्यांना मिळाला मुहूर्त; निरीक्षक झाले सहायक पोलिस आयुक्त, उपअधीक्षक

    दिनांक :25-Jun-2026
Total Views |
अनिल कांबळे

नागपूर,
Maharashtra police promotion राज्य पोलिस दलातील पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या पोलिस निरीक्षकांना अखेर मोठा दिलासा मिळाला असून राज्य शासनाने २२४ पोलिस निरीक्षकांना पदोन्नती देत सहायक पोलिस आयुक्त (एसीपी) आणि पोलिस उपअधीक्षक (डीवायएसपी) पदावर नियुक्ती केली आहे. गेल्या जवळपास सहा महिन्यांपासून रखडलेल्या या पदोन्नत्यांना अखेर मुहूर्त मिळाल्याने राज्यभरातील पोलिस अधिकाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
 

Maharashtra police promotion 
राज्य पोलिस दलात वरिष्ठ पोलिस निरीक्षकांपासून सहायक पोलिस आयुक्त अथवा पोलिस उपअधीक्षक पदावर पदोन्नती देण्याची प्रक्रिया अनेक महिन्यांपासून प्रलंबित होती. पदोन्नतीसाठी पात्र असलेल्या अधिकाऱ्यांना महसूल संवर्गातील वरिष्ठतेसह विविध प्रशासकीय प्रक्रियांची पूर्तता होण्याची प्रतीक्षा करावी लागत होती. त्यामुळे अनेक अधिकारी सहा महिन्यांहून अधिक काळ पदोन्नतीच्या प्रतीक्षेत होते. दरम्यान, २३ जून २०२६ रोजी गृह विभागाने पोलिस निरीक्षक ते सहायक पोलिस आयुक्त,पोलिस उपअधीक्षक पदोन्नतीची यादी जाहीर केली. या यादीत राज्यातील २२४ पोलिस निरीक्षकांचा समावेश करण्यात आला आहे. पदोन्नती मिळालेल्या अधिकाऱ्यांना लवकरच नव्या पदांवर रुजू होण्यासाठी मूळ घटकातून सोडले जाणार असून त्यानंतर पदस्थापनेची प्रक्रिया देखील वेगाने राबविली जाणार आहे. या पदोन्नत्यांमुळे राज्यातील अनेक पोलिस आयुक्तालये, जिल्हा पोलिस दल तसेच विशेष शाखांमधील रिक्त वरिष्ठ पदे भरण्यास मदत होणार आहे. परिणामी प्रशासकीय कामकाजाला गती मिळण्याबरोबरच कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने पोलिस यंत्रणेची कार्यक्षमता वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
गेल्या काही काळात पोलिस दलातील विविध संवर्गांतील पदोन्नत्या रखडल्याने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण होते. Maharashtra police promotion  मात्र, शासनाने २२४ अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा निर्णय जाहीर केल्याने पोलिस दलात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक अधिकाऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत करत शासन आणि वरिष्ठ पोलिस प्रशासनाचे आभार मानले आहेत. राज्यातील पोलिस दलाच्या प्रशासकीय रचनेत या पदोन्नत्यांना महत्त्वाचे स्थान मानले जात असून आगामी काळात इतर प्रलंबित पदोन्नत्यांनाही गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
 
 
नागपुरातील १० पोलिस निरीक्षक झाले एसीपी
 
नागपुरातील वरिष्ठ पोलिस अधिकारी राजेश तटकरे, चंद्रशेखर चकाटे, वैभव जाधव, महेश चव्हाण, विजय मालचे, हेमंत चांदेवार यांच्यासह १० पोलिस निरीक्षकांना पदोन्नती मिळाली आहे. यांना अन्य घटकांमध्ये नियुक्ती मिळाली आहे. लवकरच त्यांना आयुक्तालयातून नव्या ठिकाणी रुजू होण्यासाठी सोडण्यात येणार आहे. गेल्या सहा महिन्यांपूर्वी या अधिकाऱ्यांना महसुली संवर्ग मागविण्यात आला होता. मात्र, आता पदोन्नतीची यादी जाहीर झाल्यामुळे आनंद व्यक्त करण्यात येत आहे.