नवी दिल्ली,
6 heroes of Operation Sindoor २२ एप्रिल २०२५ रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर कारवाई करत ऑपरेशन सिंदूर सुरू केले होते. या महत्त्वपूर्ण लष्करी मोहिमेदरम्यान भारतीय सैन्याच्या सहा शूर जवानांनी देशरक्षणासाठी सर्वोच्च बलिदान दिले. आता या सहा जवानांची नावे नवी दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारकावर कायमस्वरूपी कोरली जाणार आहेत.राष्ट्रीय युद्ध स्मारकाच्या संकेतस्थळावर या शहीद जवानांची नावे प्रथमच अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहेत. शहीदांमध्ये भारतीय लष्कराचे पाच जवान आणि भारतीय हवाई दलातील एका सार्जंटचा समावेश आहे.

शहीद जवानांमध्ये सुभेदार मेजर पवन कुमार, रायफलमन सुनील कुमार, लान्स नाईक दिनेश कुमार, अग्निवीर मूड मुरली नाईक, हवालदार सुनील कुमार सिंग आणि सार्जंट सुरेंद्र कुमार यांचा समावेश आहे.या जवानांपैकी दोन जणांना त्यांच्या असामान्य शौर्यासाठी मरणोत्तर सन्मान देण्यात आला आहे. रायफलमन सुनील कुमार यांना देशातील तिसरा सर्वोच्च युद्धकालीन शौर्य पुरस्कार असलेला वीरचक्र मरणोत्तर प्रदान करण्यात आला. तर सार्जंट सुरेंद्र कुमार यांना मरणोत्तर एअर मेडलने सन्मानित करण्यात आले.ऑपरेशनदरम्यान रायफलमन सुनील कुमार नियंत्रण रेषेवर तैनात होते. ८ जून रोजी झालेल्या संरक्षण पदग्रहण समारंभात राष्ट्रपतीद्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांना मरणोत्तर वीरचक्र प्रदान करण्यात आले. दरम्यान, राजीव घई यांची एनएससीएसचेनवे लष्करी सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ऑपरेशन सिंदूरदरम्यान त्यांनी डीजीएमओ म्हणून महत्त्वाची जबाबदारी सांभाळली होती.
राष्ट्रीय युद्ध स्मारकातील ‘त्याग चक्र’ हे देशासाठी बलिदान देणाऱ्या वीर जवानांना समर्पित आहे. या स्मारकात १६ गोलाकार ग्रॅनाइट भिंती असून त्यावर स्वातंत्र्यानंतर देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या जवानांची नावे, पद आणि तुकड्यांची माहिती कोरलेली आहे. आता ऑपरेशन सिंदूरमधील या सहा शूर जवानांची नावेही या गौरवशाली स्मारकाचा कायमचा भाग बनणार आहेत. देशाच्या सुरक्षेसाठी प्राणांची आहुती देणाऱ्या या जवानांचे बलिदान राष्ट्राला कायम प्रेरणा देत राहील.