प्रेयसीचा अबोला अन् प्रियकराचा रेल्वे ट्रॅकवर आत्महत्येचा प्रयत्न

पोलिसांनी वाचवले युवकाचे प्राण

    दिनांक :26-Jun-2026
Total Views |
अनिल कांबळे

नागपूर,
Beltarodi Police प्रेयसीने लग्न करण्यास नकार दिल्यानंतर संबंध तोडल्यामुळे नैराश्यात गेलेल्या तरुणाने रेल्वे रुळावर जाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, बेलतरोडी ठाण्याच्या तीन पोलिस कर्मचाऱ्यांना गस्त घालताना हा प्रकार लक्षात आला. पोलिस कर्मचाऱ्यांनी रेल्वे रुळावर धाव घेऊन त्या युवकाला अगदी काही सेकंदापूर्वीच रुळावरुन ओढून त्याचे प्राण वाचवले. त्याचे समूपदेशन केल्यानंतर पालकांच्या ताब्यात देण्यात आले. या घटनेनेतर बेलतरोडीच्या ठाणेदारांनी त्या युवकाचा जीव वाचविणाऱ्या तीनही पोलिस कर्मचाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. पोलिस हवालदार रुपेश साबळकर, नितीन तोंडे, केतन अशी त्या देवदूत ठरलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
 
 
 
Beltarodi Police
राजश्रीनगरात राहणाऱ्या २८ वर्षीय युवक प्रतिक हा पूर्वी प्लंबिंगचे काम करीत होता. त्याचे अजनीत राहणाऱ्या २२ वर्षीय तरुणीशी ओळख झाली. दोघांचीही गेल्या दोन वर्षांपासून मैत्री होती. त्यानंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. दोघांचे प्रेमसंबंध सुरुळीत सुरु असतानाच प्रतिकने तिला लग्नाची गळ घातली. मात्र, लग्नासाठी प्रेयसी तयार नव्हती. त्यामुळे दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. प्रतिक तिला लग्नासाठी तगादा लावत होता तर प्रेयसी लग्न करण्यास टाळाटाळ करीत होती. गेल्या काही महिन्यांपूर्वी प्रेयसीने लग्नास स्पष्ट नकार दिली. त्यामुळे तो चिडला. त्याने तिला शिवीगाळ करीत लग्न करण्यासाठी विनवणी केली. मात्र, तरुणीने त्याला नकार देऊन प्रेमसंबंध तोडले.
 
 
प्रियकराची रेल्वे ट्रॅकवर धाव
प्रतिकने आईवडिलांना त्याच्या लग्नाची बोलणी करण्यासाठी प्रेयसीच्या घरी पाठविले होते. मात्र, तरुणी आणि तिच्या कुटुंबियांनी लग्नास नकार दिला. तो एकाकी राहायला लागला. घरात तासनतास कुटुंबियांशी भांडून प्रेयसीच्या आईवडिलांची मनधरणी करण्यासाठी प्रोत्साहन द्यायचा. त्यामुळे प्रतिक नैराश्यात गेला. प्रेयसीचा नकार न पचविता आल्याने त्याने आत्महत्येचा निर्णय घेतला. रेल्वे ट्रॅकवर धावत्या रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या करण्याचे त्याने ठरविले.
 
 
पोलिसांची सतर्कता
सकाळी वंदे भारत एक्स्प्रेस जाण्याच्या वेळेवर मनिषनगर पुलाजवळील रेल्वे रुळावर एक तरुण झाेपलेला असल्याची माहिती बेलतरोडीचे ठाणेदार रितेश अहेर यांना मिळाली. त्यांनी लगेच वस्तीत गस्त घालणारे पोलिस हवालदार रुपेश साबळकर, नितीन तोंडे, केतन यांना त्वरित घटनास्थळावर पोहचण्यास सांगितले. तीनही कर्मचारी वेळ न दडवता तेथे पोहचले. वंदे भारत एक्स्प्रेस काही अंतरावर असतानाच त्यांनी प्रतिकला बाजूला ओढले आणि त्याचा जीव वाचवला. त्याचे समूपदेशन करुन त्याच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले. ठाणेदार अहेर यांनी तीनही कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करुन त्यांचा पुष्पगुच्छ आणि शाल-श्रीफळ देऊन सत्कार केला.