केतन विग वापरत असल्याने वाढला वाद?

सिया गोयलच्या जबाबातून धक्कादायक खुलासा

    दिनांक :26-Jun-2026
Total Views |
पुणे,
Controversy over Ketan wearing a wig पुणे जिल्ह्यात गाजत असलेल्या केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात तपास जसजसा पुढे जात आहे, तसतसे नवे दावे आणि धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, आरोपी सिया गोयलने चौकशीदरम्यान केतन अग्रवालबाबत काही महत्त्वाची माहिती दिल्याचा दावा करण्यात येत आहे.तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, सिया गोयलला केतनसोबत लग्न करायचे नव्हते. केतनला टक्कल असल्याने तो डोक्यावर केसांचा विग वापरत होता आणि ही बाब सियाला मान्य नव्हती, असा दावा पोलिसांकडून समोर आला आहे. याच कारणातून दोघांमध्ये दुरावा निर्माण झाल्याचेही सांगितले जात आहे.
 

 wearing a wig 
 
या प्रकरणात सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी यांनी केतनच्या हत्येचा कट रचल्याचा पोलिसांचा संशय आहे. केतनला ट्रेकिंगची विशेष आवड असल्याची माहिती दोघांना होती. याचाच फायदा घेत त्याला किल्ल्यावर नेऊन खोल दरीत ढकलायचे आणि त्याला अपघाताचे स्वरूप द्यायचे, अशी योजना आखल्याचा तपास यंत्रणांचा दावा आहे. या कथित कटासाठी लोहगड किल्ल्याची निवड करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. आरोपींनी तब्बल तीन वेळा किल्ल्यावर जाऊन रेकी केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. कोणत्या ठिकाणी खोल दरी आहे आणि कुठून ढकलल्यास अपघातासारखे दिसेल, याची पाहणी करण्यात आली होती.
 
तपासानुसार, १४ जून रोजी केतन आणि सिया प्रथमच लोहगडावर गेले होते. त्यावेळी केतनला दरीत ढकलण्याचा कथित प्रयत्न झाला. मात्र, खाली पडताना त्याने झाडाची फांदी पकडल्याने त्याचा जीव वाचल्याचा दावा आहे. त्यानंतर “साप दिसला होता” असे सांगून प्रसंग झाकण्याचा प्रयत्न झाल्याचे तपासात समोर आले आहे. यानंतर केतला एकटीने ढकलणे शक्य नसल्याचे लक्षात आल्यावर सियाने चेतनची मदत घेतल्याचा आरोप आहे. १८ जून रोजी चेतनही लोहगडावर पोहोचला. पोलिसांच्या दाव्यानुसार, योग्य संधी साधून आणि सियाच्या इशाऱ्यावरून चेतनने केतनला खोल दरीत ढकलले. सुरुवातीला ही घटना अपघात असल्याचे मानले जात होते. मात्र, मोबाईल कॉल रेकॉर्ड, आरोपींच्या हालचाली, घटनास्थळावरील पुरावे आणि इतर तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी तपासाची दिशा बदलली. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून अनेक महत्त्वाचे धागेदोरे समोर येत आहेत.