जगाची धडधड पुन्हा वाढली; होर्मुझमध्ये हल्ला!

इराण-अमेरिका चर्चेवर संकट

    दिनांक :26-Jun-2026
Total Views |
तेहरान,
Crisis over Iran-US talks इराण आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या शांतता चर्चेदरम्यान मध्य पूर्वेत तणाव आणखी वाढला आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या एका जहाजावर इराणकडून हल्ला झाल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंता वाढली आहे. विशेष म्हणजे, तेहरानच्या परवानगीशिवाय कोणत्याही जहाजाने होर्मुझ सामुद्रधुनीचा वापर करू नये, असा इशारा इराणने दिल्यानंतर अवघ्या काही तासांतच हा हल्ला घडला. संयुक्त राष्ट्रांच्या सागरी संस्थेशी संबंधित अधिकाऱ्यांनी या घटनेनंतर मोठा निर्णय घेतला आहे. महासचिव आर्सेनियो डोमिंगेझ यांनी स्पष्ट केले की, हल्ला झालेले जहाज हे रिकामीकरण मोहिमेचा भाग नव्हते. मात्र, या घटनेनंतर पर्शियन आखातात अडकलेल्या जहाजांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याची योजना तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. जोपर्यंत त्या भागातील जहाजांची सुरक्षितता सुनिश्चित होत नाही, तोपर्यंत ही प्रक्रिया पुढे नेण्यात येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.
 
 

Crisis over Iran-US talks 
दरम्यान, अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या अण्वस्त्र क्षमतेवर मोठे वक्तव्य केले. ट्रम्प म्हणाले, इराणने पहिल्याच तासात अण्वस्त्रांचा वापर केला असता. मात्र आता त्यांनी ती क्षमता न मिळवण्याचे मान्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना वेग आला आहे. याचवेळी इराणने इस्राईलाही कडक इशारा दिला आहे. लेबनॉनमधून माघार घ्या, अन्यथा अपमानास्पद पराभवाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा, असा थेट संदेश इराणकडून देण्यात आला. इराणचे मुख्य वाटाघाटीकार मोहम्मद बाघेरी गालिबाफ यांनी ट्रम्प यांच्या प्रस्तावालाही जोरदार विरोध दर्शवला. इराणची मालमत्ता अमेरिकेच्या कृषी उत्पादनांच्या खरेदीसाठी वापरण्याचा प्रस्ताव फेटाळून लावत त्यांनी सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया दिली. “आमच्या मालमत्तेबाबत अमेरिका खोटे दावे करत आहे. अनेक दशकांच्या अविश्वासाचे परिणाम आता दिसत आहेत,” असे त्यांनी म्हटले.अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांनीही इराणबाबत स्पष्ट भूमिका मांडली. अमेरिका युद्ध संपवण्यासाठी कराराच्या बाजूने असली तरी तो कोणत्याही किंमतीवर स्वीकारला जाणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले. विशेषतः होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर टोल किंवा शुल्क आकारण्याच्या इराणच्या भूमिकेला त्यांनी पूर्णपणे नाकारले.
 
रुबियो म्हणाले, टोल असो, शुल्क असो किंवा कोणतेही अन्य नाव असो, ही अट स्वीकारता येणार नाही. जर इराणने हा मार्ग अवलंबला, तर जगातील इतर देशही महत्त्वाच्या जलमार्गांवर असेच शुल्क लावू शकतात आणि त्यामुळे जागतिक स्तरावर अराजकता निर्माण होईल.अमेरिकन अधिकाऱ्यांनी होर्मुझ सामुद्रधुनी खुली असल्याचा दावा केला असला, तरी प्रत्यक्षात परिस्थिती तणावपूर्ण दिसत आहे. तेल आणि वायू पुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या या मार्गावर अनेक मालवाहू जहाजांनी अचानक आपले मार्ग बदलल्याची माहिती ब्रिटिश नौदलाशी संबंधित गटाने दिली आहे. याच गोंधळाच्या पार्श्वभूमीवर एका जहाजावर हल्ला झाल्याने मध्य पूर्वेतील संघर्ष आणखी गंभीर टप्प्यावर पोहोचल्याचे चित्र आहे.