दिल्ली
delhi mumbai expressway accident दिल्ली–मुंबई एक्स्प्रेस वेवर गुरुवारी सकाळी घडलेल्या भीषण अपघाताने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. एका 7-सीटर कारने भरधाव वेगात समोरील अवजड ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने चार जणांचा जागीच आणि उपचारादरम्यान मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. हे सर्व जण मोबाईल ॲक्सेसरीज खरेदीसाठी दिल्लीकडे निघाले होते.
मृतांमध्ये रवींद्र भागवत काळे (वय 28), संदीप नवनाथ बोरसे (वय 30), सचिन गंगाधर गजभारे (वय 37) आणि राजेंद्र भावराव कवडे (वय 46) यांचा समावेश आहे. तर अब्दुल खलील अब्दुल समद (वय 30) आणि उमर इस्माईल जहागीरदार (वय 32) हे गंभीर जखमी झाले आहेत. सर्व मृत आणि जखमी छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी असून व्यावसायिक असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कारचालक रवींद्र काळे यांच्या MH 20 GE 7359 क्रमांकाच्या 7-सीटर वाहनातून सहा जण बुधवारी मध्यरात्री सुमारे 12 वाजता दिल्लीच्या दिशेने रवाना झाले होते. गुरुवारी सकाळी मध्य प्रदेशातील मंदसौर जिल्ह्यातील तितरोद शिवारात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार थेट समोरील अवजड ट्रकवर पाठीमागून जोरात आदळली. धडकेची तीव्रता इतकी होती की कारचा पुढील भाग पूर्णपणे चुराडा झाला.
या अपघातात दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर उर्वरित जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान आणखी दोघांनी प्राण गमावले. अपघातानंतर कारमालक रवींद्र काळे यांच्या मोबाईलवरून पोलिसांनी नातेवाईकांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. त्यानंतर कुटुंबीय तातडीने मंदसौरकडे रवाना झाले.या दुर्दैवी घटनेमुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये हळहळ व्यक्त केली जात असून व्यापारी वर्तुळातही शोककळा पसरली आहे. अचानक घडलेल्या या अपघाताने संपूर्ण कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
दरम्यान, वाशिमजवळ खुराणा delhi mumbai expressway accident ट्रॅव्हल्सच्या बसचा आणखी एक अपघात घडला आहे. रेल्वे उड्डाणपुलाजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस दुभाजक ओलांडून थेट टिनपत्र्यांच्या दुकानांमध्ये घुसली. या घटनेत चिकन, मटण आणि पानपट्टीची तीन ते चार दुकाने उद्ध्वस्त झाली. सुदैवाने पहाटे 3 ते 4 च्या सुमारास दुकाने बंद असल्याने मोठा अनर्थ टळला. या अपघातात चालकासह तीन ते चार प्रवासी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.