इक्वेडोरची नॉकआऊटमध्ये; जर्मनीचा धक्कादायक पराभव

    दिनांक :26-Jun-2026
Total Views |
वॉशिंग्टन,
Ecuador in the knockout फिफा विश्वचषक २०२६ मध्ये गुरुवारी गट ‘इ’ मधील सामने अत्यंत रंगतदार ठरले. या सामन्यांनंतर नॉकआऊट फेरीत प्रवेश करणारे संघ निश्चित झाले. सर्वात मोठा धक्का म्हणजे Ecuadorने चार वेळच्या विजेत्या जर्मनीचा २-१ असा पराभव करत पुढील फेरीतील आपले स्थान पक्के केले. दुसऱ्या सामन्यात आयव्हरी कोस्टने कुराकाओवर २-० अशी मात करत इतिहासात पहिल्यांदाच विश्वचषकाच्या नॉकआऊट फेरीत प्रवेश केला.इक्वेडोर आणि जर्मनी यांच्यातील सामना सुरुवातीपासूनच वेगवान झाला. सामन्याच्या अवघ्या दुसऱ्या मिनिटाला लेरॉय साने याने गोल करत जर्मनीला १-० अशी आघाडी मिळवून दिली. मात्र, ही आघाडी फार काळ टिकली नाही. इक्वेडोरने दमदार पुनरागमन करत ९ व्या मिनिटाला निलसन अँगुलोच्या गोलच्या जोरावर सामना १-१ असा बरोबरीत आणला. पहिल्या हाफअखेर दोन्ही संघांची बरोबरी कायम होती.
 

Ecuador in the knockout 
 
दुसऱ्या हाफमध्ये इक्वेडोरने अधिक आक्रमक खेळ करत जर्मनीवर दबाव कायम ठेवला. अखेर ७७ व्या मिनिटाला गोंझालो प्लाटा याने अप्रतिम गोल करत इक्वेडोरला २-१ अशी निर्णायक आघाडी मिळवून दिली. जर्मनीने शेवटपर्यंत बरोबरी साधण्याचा प्रयत्न केला, मात्र इक्वेडोरच्या मजबूत बचावामुळे त्यांना यश मिळाले नाही. या विजयासह इक्वेडोरने नॉकआऊट फेरीत प्रवेश केला, तर आधीच पात्र ठरलेल्या जर्मनीला स्पर्धेतील पहिल्या पराभवाला सामोरे जावे लागले. दुसऱ्या सामन्यात आयव्हरी कोस्टने सुरुवातीपासूनच वर्चस्व गाजवले. सामन्याच्या ७ व्या मिनिटाला निकोलस पेपे याने शानदार गोल करत संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. पहिल्या सत्रात मिळालेली आघाडी कायम राखत आयव्हरी कोस्टने दुसऱ्या हाफमध्येही आक्रमकता कमी होऊ दिली नाही.
 
कुराकाओने सामन्यात पुनरागमनासाठी अनेक प्रयत्न केले, पण आयव्हरी कोस्टच्या भक्कम बचावापुढे त्यांचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. ६४ व्या मिनिटाला पुन्हा एकदा निकोलस पेपे याने गोल करत संघाची आघाडी २-० अशी भक्कम केली आणि विजयावर शिक्कामोर्तब केले.या विजयामुळे आयव्हरी कोस्टने गट ‘इ’मध्ये दुसरे स्थान पटकावत बाद फेरीत प्रवेश केला. दुसरीकडे, पहिल्यांदाच विश्वचषकात सहभागी झालेल्या कुराकाओचा स्पर्धेतील प्रवास याच टप्प्यावर संपला.