शहर गुन्हे शाखेची कारवाई
अमरावती,
Electronic cigarettes seized शहर गुन्हे शाखेच्या पथकाने केडीया नगर येथील गजानन टॉवर अपार्टमेन्टमधील एका फ्लॅटमधून एकूण २.७५ लाखांच्या इलेक्ट्रॉनिक सिगारेट जप्त केल्या. शुक्रवार, २६ जून रोजी गुन्हे शाखेच्या पथकास केडीया नगर येथील गजानन टॉवर अपार्टमेन्टमधील ५०१ नंबरच्या फ्लॅटमध्ये आशिष कडू नामक इसमाने सरकारने प्रतिबंधित केलेल्या इलेक्ट्रॉनिक सिगारेटचा अनाधिकृत साठा करून ठेवल्याची गोपनीय माहिती मिळाली.
त्यावरून गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अतुल वर व त्यांच्यासोबत गुन्हे शाखेचे पथक त्या ठिकाणी गेले व आशिष बाबूराव कडू या सोबत घेऊन फ्लॅटची झडती घेतली असता स्टोअर रूममध्ये एक पृष्ठाचा खोका आढळला. त्याची पाहणी केली असता त्यामध्ये वेगवेगळ्या फ्लेवरच्या एकूण २ लाख ७५ हजार रुपयांच्या ५५ इलेक्ट्रॉनिक सिगारेट आढळल्याने कडू याला ताब्यात घेऊन इलेक्ट्रॉनिक सिगारेट जप्त केल्या व राजापेठ पोलिस ठाण्यात आरोपीला मुद्देमालासह नेऊन गुन्हा दाखल केला. ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अतुल वर, पोलिस निरीक्षक दिनेश दहातोंडे यांच्या नेतृत्वात सहाय्यक निरीक्षक महेश इंगोले, मनिष वाकोडे, दशरथ आडे, उपनिरीक्षक गजानन सोनुने, पोलिस कर्मचारी सुनील लासूरकर, दीपक सुंदरकर, गजानन ढेवले, आस्तिक देशमुख, मनोज ठोसर, मंगेश परिमल, सचिन बहाळे, जहीर शेख, मिर्झा नईम बेग, अतुल संभे, विकास गुडधे, विशाल वाकपांजर, योगेश पवार, राजीक रायलीवाले, चेतन गुल्हाने, चालक संदीप खंडारे, राहुल दुधे यांनी केली.