बुलढाणा जिल्ह्याला सर्वाधिक १०.९९ कोटींचा निधी
बुलढाणा,
Government assistance to farmers राज्यात मार्च २०२६ मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे नुकसान झालेल्या शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने अकोला, बुलढाणा आणि भंडारा जिल्ह्यांसाठी एकूण १३ कोटी २७ लाख ९८ हजार रुपयांच्या मदतीस मंजुरी दिली आहे. आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय २५ जून २०२६ रोजी निर्गमित केला आहे. नुकसानभरपाईची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात डीबीटी प्रणालीद्वारे जमा करण्यात येणार असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिली.
शासन निर्णयानुसार तिन्ही जिल्ह्यांतील १४ हजार ७१६ बाधित शेतकर्यांच्या ७ हजार ९३४.७२ हेटर क्षेत्रावरील शेतीपिकांच्या नुकसानीसाठी ही मदत वितरित केली जाणार आहे. यामध्ये बुलढाणा जिल्ह्याला सर्वाधिक निधी मंजूर करण्यात आला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील १२ हजार ५२ बाधित शेतकर्यांच्या ६ हजार ६१०.६३ हेटर क्षेत्रावरील पिकांच्या नुकसानीपोटी १० कोटी ९९ लाख ३९ हजार रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. अकोला जिल्ह्यातील १ हजार ४७६ शेतकर्यांच्या ९७५.३१ हेटर क्षेत्रासाठी १ कोटी ६९ लाख २६ हजार रुपये, तर भंडारा जिल्ह्यातील १ हजार १८८ शेतकर्यांच्या ३४८.७८ हेटर क्षेत्रासाठी ५९ लाख ३३ हजार रुपये निधी वितरित करण्यात येणार आहे. निधी वितरण प्रक्रियेदरम्यान कोणत्याही लाभार्थ्याची दुबार गणना होणार नाही, याची जिल्हाधिकारी व तहसीलदार कार्यालयांनी दक्षता घ्यावी, असे निर्देश शासनाने दिले आहेत. एका हंगामात एकदाच विहित दरानुसार मदत दिली जाणार आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकर्यांना मंजूर झालेली मदत बँकांनी कर्जवसुलीसाठी अथवा इतर कोणत्याही कारणासाठी अडवू नये, यासाठी जिल्हाधिकार्यांनी सर्व बँकांना आवश्यक सूचना देण्याचे आदेशही शासनाने दिले आहेत. मदत वितरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी आणि मदतीचा सविस्तर तपशील संबंधित जिल्ह्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तसेच निधीच्या खर्चाचे लेखापरीक्षण आणि ताळमेळाची जबाबदारी संबंधित विभागीय आयुक्तांकडे सोपविण्यात आली आहे. शासनाने तातडीने पंचनामे करून आर्थिक मदतीस मंजुरी दिल्यामुळे अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकर्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी सांगितले.