अंमली पदार्थाच्या उच्चाटनासाठी प्रत्येक घटकांनी पुढे यावे : पालकमंत्री डॉ. भोयर

    दिनांक :26-Jun-2026
Total Views |
आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ विरोधीदिन
 
वर्धा, 
Guardian Minister Dr. Bhoyar भारत हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. ज्या देशाकडे सर्वात अधिक तरुण शक्ती आहे. परंतु, आज तरुण शक्तीला व्यसनाधीनतेची कीड लागली आहे. ही कीड आपल्या देशाला आतून पोखरत चालली आहे. त्यामुळे स्वत:, कुटुंब व समाजावर मोठा परिणाम होत आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकांनी अमली पदार्थाच्या समुळ उच्चाटनासाठी एकत्र यावे, असे आवाहन पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केले.
 
rally
 
आज आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ दिनानिमित्त पोलिस विभागाच्या वतीने जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. महात्मा गांधी चौक येथून पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला व रॅलीमध्ये सहभागी होऊन स्वाध्याय मंदिर येथे रॅलीचा समारोप करण्यात आला. समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी वान्मथी सी., पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, नगराध्यक्ष सुधीर पांगुळ, कस्तुरबा हॉस्पिटलचे डॉ. इंद्रजित खांडेकर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
 
 
गांजा उत्पादन हे ग्रामीण भागात होत असते. गावांमध्ये गांजाचे उत्पादन होत असल्यास तत्काळ पोलिस प्रशासनाला पोलिस पाटीलांनी माहिती द्यावी. राज्य शासनाच्या निर्णयान्वये आता पोलिस विभागातील अधिकारी व कर्मचार्यांनी अमली पदाथ्र्यांच्या सेवन विक्रीत सहभाग नोंदविल्यास त्यांच्यावर निलंबनासोबतच बडतर्फ करण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचे ना. भोयर म्हणाले.
युवा पिढीला अमली पदार्थांपासून दूर ठेवणे व सायबर गुन्ह्यावर आळा बसविण्याचे गृह विभागाकडे मोठे आव्हान आहे. त्यासाठी समाजातील सर्व नागरिकांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य करून अंमली पदार्थाला नकार देऊन समृद्ध व विकसनशील भारत बनविण्यास मदत करू या, असे आवाहन पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केले.
 
 
दारू, सिगारेट, तंबाखूपासून सुरू झालेला हा प्रवास आज ड्रग्ज (अमली पदार्थ) सारख्या जीवघेण्या व्यसनांपर्यंत पोहोचला आहे, असे जिल्हाधिकारी वान्मथी सी म्हणाल्या. पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, इंद्रजित खांडेकर यांनी मनोगत व्यक्त केले. रॅलीमध्ये पोलिस विभागाचे अधिकारी व कर्मचारी, एनसीसी, होमगार्ड, पोलिस पाटील, सेवानिवृत्त पोलिस, पोलिस बाईज, परीचारिका व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.