मुंबई
indian railways भारतात दररोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. या प्रवासादरम्यान रेल्वेच्या नियमांचे पालन करणे प्रत्येक प्रवाशासाठी बंधनकारक असते. कारण रेल्वे प्रशासनाने काही वस्तू सोबत नेण्यास बंदी घातली असून, या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईसह दंडात्मक कारवाईही केली जाऊ शकते. मात्र, रेल्वेने प्रवास करणाऱ्या खेळाडूंसाठी आता एक दिलासादायक निर्णय घेतला आहे. केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने नव्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार मोठ्या आकाराचे क्रीडा साहित्य रेल्वेत नेण्यास परवानगी दिली आहे.
रेल्वे मंत्रालयाने जारी केलेल्या परिपत्रकात मोठ्या आकाराच्या तसेच नाजूक क्रीडा साहित्याच्या वाहतुकीसंदर्भातील नियम स्पष्ट करण्यात आले आहेत. ही सुविधा सर्व प्रकारच्या क्रीडा साहित्याला लागू होणार नसली, तरी काही विशिष्ट साहित्य वाहून नेण्यास सशर्त परवानगी देण्यात आली आहे.
नव्या नियमांनुसार भालाफेकीसाठी वापरला जाणारा भाला तसेच इतर मोठ्या आकाराचे क्रीडा साहित्य आवश्यक मालवाहतूक शुल्क भरल्यानंतर रेल्वेत घेऊन जाता येणार आहे. अशा साहित्याला रेल्वेच्या लगेज डब्यात प्राधान्याने जागा उपलब्ध करून दिली जाईल, जेणेकरून खेळाडूंना प्रवासादरम्यान कोणतीही अडचण येणार नाही. याशिवाय, या क्रीडा साहित्यावर सामान्य सामानासाठी लागू असलेली वजन मर्यादाही लागू होणार नसल्याचे रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे या निर्णयाचा देशभरातील खेळाडूंना मोठा फायदा होणार आहे.
मात्र, नव्या नियमांमध्ये पोल व्हॉल्ट स्पर्धेसाठी वापरला जाणारा पोल समाविष्ट करण्यात आलेला नाही. त्याची लांबी आणि तांत्रिक कारणांमुळे तो कोणत्याही प्रवासी डब्यात सुरक्षितपणे वाहून नेता येत नसल्याने त्याला परवानगी देण्यात आलेली नाही. मात्र, इतर पात्र क्रीडा साहित्य घेऊन प्रवास करण्यास खेळाडूंना मुभा असेल.
दरम्यान, रेल्वेच्या विद्यमान indian railways नियमांनुसार काही वस्तूंवर अद्यापही कठोर बंदी कायम आहे. पेट्रोल, डिझेल किंवा अन्य ज्वलनशील पदार्थ, फटाके, दारूगोळा किंवा स्फोटके, गॅस सिलेंडर, शस्त्रे तसेच कोणत्याही प्रकारचे धोकादायक साहित्य रेल्वेत नेण्यास मनाई आहे. अशा वस्तू प्रवासादरम्यान आढळल्यास संबंधित प्रवाशाविरुद्ध कारवाई करण्यात येऊ शकते तसेच दंडही आकारला जाऊ शकतो. त्यामुळे प्रवाशांनी रेल्वे प्रवास करताना या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.