२०७५ मध्ये इस्लाम सर्वात मोठा धर्म?

जागतिक अहवालात मोठा खुलासा

    दिनांक :26-Jun-2026
Total Views |
मॅसॅच्युसेट्स,
Islam to be the largest religion in 2075 जागतिक स्तरावर धर्मांच्या लोकसंख्येचे चित्र वेगाने बदलत असल्याचे एका नव्या संशोधनातून समोर आले आहे. वाढती लोकसंख्या, तरुण पिढीचे प्रमाण आणि विशेषतः आफ्रिका व आशियातील लोकसंख्या वाढ यामुळे जगातील धार्मिक समतोलात मोठा बदल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या संशोधनानुसार, इस्लामचा वाढीचा वेग सध्या इतर प्रमुख धर्मांच्या तुलनेत अधिक असून येत्या काही दशकांत जागतिक धार्मिक रचनेत मोठे बदल दिसू शकतात. हा अभ्यास मॅसॅच्युसेट्समधील गॉर्डन-कॉनवेल थिओलॉजिकल सेमिनरी येथील 'सेंटर फॉर द स्टडी ऑफ ग्लोबल ख्रिश्चॅनिटी'नेप्रसिद्ध केलेल्या स्टेटस ऑफ ग्लोबल ख्रिश्चॅनिटी २०२६ या अहवालावर आधारित आहे. या अभ्यासासाठी संयुक्त राष्ट्रांची आकडेवारी, लोकसंख्या सर्वेक्षणे तसेच विविध ख्रिस्ती संघटना आणि शैक्षणिक संस्थांच्या संशोधनाचा आधार घेण्यात आला आहे.
 
 
x4656
अहवालानुसार, जागतिक मुस्लिम लोकसंख्या सध्या २ अब्जांपेक्षा अधिक झाली आहे. सध्याचा वाढीचा वेग कायम राहिला तर २०७५ पर्यंत ही संख्या सुमारे ३.४ अब्जांपर्यंत पोहोचू शकते. इस्लामचा वार्षिक वाढीचा दर अंदाजे १.५७ टक्के असल्याचे सांगण्यात आले आहे, जो ख्रिस्ती धर्माच्या ०.९५ टक्के दरापेक्षा लक्षणीयरीत्या जास्त आहे.तथापि, या जलद वाढीनंतरही शतकाच्या मध्यापर्यंत ख्रिस्ती धर्म हा जगातील सर्वात मोठा धर्म राहील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. संशोधनानुसार, २०७५ पर्यंत जगात अंदाजे २.६७ अब्ज ख्रिस्ती असतील, तर मुस्लिमांची संख्या सुमारे २.१ अब्जांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.
 
ख्रिस्ती लोकसंख्या वेगाने वाढ
अहवालात ख्रिस्ती धर्माबाबत आणखी एक महत्त्वाचा मुद्दा समोर आला आहे. ख्रिस्ती धर्म कमी होत नसून त्याचे केंद्र बदलत आहे. पूर्वी युरोप हे ख्रिस्ती धर्माचे प्रमुख केंद्र मानले जात होते, मात्र आता उप-सहारा आफ्रिका, आशियातील काही भाग आणि लॅटिन अमेरिकेत ख्रिस्ती लोकसंख्या वेगाने वाढताना दिसत आहे.दुसरीकडे, युरोपमध्ये ख्रिस्ती लोकसंख्येत दरवर्षी सुमारे ०.४ टक्क्यांनी घट होत आहे. मध्यपूर्वेत ही घट अधिक गंभीर मानली जात आहे. १९०० मध्ये मध्यपूर्वेतील ख्रिस्ती लोकसंख्येचे प्रमाण १२.७ टक्के होते, जे आता फक्त ४.२ टक्क्यांवर आले आहे. युद्ध, स्थलांतर, आर्थिक संकट, भेदभाव आणि अस्थिरता यांसारख्या कारणांमुळे हा बदल अधिक वेगाने होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
 
 
हिंदू धर्माबाबतही अहवालात महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. ख्रिस्ती धर्म, इस्लाम आणि इतर धर्मांनंतर हिंदू धर्म हा जगातील चौथा सर्वात मोठा धर्म असल्याचे सांगण्यात आले आहे. सध्या जगातील ९९ टक्के हिंदू लोकसंख्या आशिया-पॅसिफिक प्रदेशात राहते, तर त्यापैकी सुमारे ९५ टक्के हिंदू भारतामध्ये आहेत. भारत, नेपाळ आणि मॉरिशसमध्ये हिंदू हा सर्वात मोठा धार्मिक गट आहे. प्यू रिसर्च सेंटरच्या अहवालानुसार, २०५५ ते २०६० दरम्यान हिंदू लोकसंख्येच्या वाढीत काही प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे. मात्र, २०७५ साठी नेमकी लोकसंख्या किती असेल याबाबत स्पष्ट आकडेवारी उपलब्ध नाही. यापूर्वी २०१० ते २०२० या कालावधीत जगभरातील हिंदू लोकसंख्येत १२ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली होती.