पुणे,
Ketan Agrawal to lawyer Nikam पुण्यातील चर्चित लोहगड केतन अग्रवाल हत्या प्रकरणात आता महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. या प्रकरणात ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात येणार असून, त्यामुळे तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेला अधिक गती मिळण्याची शक्यता आहे.केतन अग्रवाल यांच्या हत्येप्रकरणी आरोपी सिया आणि तिचा मित्र चेतन यांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास पुणे पोलीस अत्यंत बारकाईने करत असून चौकशीतून दररोज नवे तपशील समोर येत आहेत. तपासाचा भाग म्हणून पोलिसांनी आता सिया गोयलच्या कुटुंबीयांकडेही चौकशीचा मोर्चा वळवला आहे. याच पार्श्वभूमीवर सियाच्या भावालाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, केतन अग्रवाल यांचे वडील विशाल अग्रवाल यांनी पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत मुलाला न्याय मिळावा, अशी मागणी केली. या प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा मिळावी आणि कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.यावेळी अग्रवाल कुटुंबीयांनी या खटल्याची सुनावणी जलदगती न्यायालयात व्हावी, तसेच ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करावी, अशी मागणी केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही मागणी तत्काळ मान्य करत विधी व न्याय विभागाला आवश्यक निर्देश दिले आहेत. उज्ज्वल निकम यांनीही या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून काम करण्यास सहमती दर्शवली आहे.
दरम्यान, या घटनेनंतर मानसिक धक्का बसल्याने सियाचे वडील रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांची प्रकृती आता स्थिर असून त्यांना अतिदक्षता विभागातून जनरल वॉर्डमध्ये हलवण्यात आले आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी सियाच्या लग्नासंदर्भात महत्त्वाची माहिती दिली. सियावर लग्नासाठी कोणताही कौटुंबिक दबाव नव्हता, असे त्यांनी स्पष्ट केले. केतन अग्रवाल यांचे स्थळ आल्यावर सिया आनंदी होती आणि तिने स्वतःच्या इच्छेने केतनची निवड केली होती, असा खुलासाही सियाच्या वडिलांनी केला. या नव्या माहितीमुळे प्रकरणातील तपासाला आणखी नवे वळण मिळाले असून पुढील चौकशीत आणखी महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता आहे.