सोलापूर,
Ladki Bahin scheme मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी सोलापूर जिल्ह्यातून चिंताजनक चित्र समोर आले आहे. योजनेअंतर्गत दर महिन्याला मिळणारे १५०० रुपये अनेक पात्र महिलांच्या खात्यात जमा होत नसल्याने महिलांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. लाभ बंद झाल्याने अनेक महिला गेल्या काही दिवसांपासून कार्यालयांचे उंबरठे झिजवत महिला व बालविकास विभागाच्या कार्यालयात चौकशीसाठी हेलपाटे मारताना दिसत आहेत. सोलापूर जिल्ह्यात सुरुवातीला तब्बल ११ लाख ३० हजार ५६३ महिलांना या योजनेचा लाभ मिळत होता. यासाठी राज्य सरकारकडून दरमहा १६९ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात येत होता. मात्र, अलीकडे झालेल्या ई-केवायसी पडताळणीनंतर मोठ्या प्रमाणावर महिलांना अपात्र ठरवण्यात आले आहे. त्यामुळे लाभार्थी महिलांची संख्या घटली असून जिल्ह्यासाठी मिळणारा निधीही कमी झाला आहे.

योजनेच्या नियमांनुसार चारचाकी वाहन असलेल्या महिला, वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त असलेल्या महिला, २१ वर्षांखालील किंवा ६५ वर्षांवरील महिला तसेच इतर काही सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना या योजनेतून वगळण्यात आले आहे. या अटींमुळे अनेक महिलांचा लाभ थांबला आहे. दरम्यान, या योनेत आणखी एक गंभीर समस्या समोर आली आहे. योजना सुरू झाली तेव्हा १९ किंवा २० वर्षांच्या असलेल्या अनेक तरुणी आता २१ वर्षांच्या झाल्या आहेत. नियमानुसार त्या आता पात्र ठरत असल्या तरी नवीन अर्ज प्रक्रिया सुरू नसल्यामुळे त्यांना अर्ज करता येत नाही. परिणामी, पात्र असूनही अनेक तरुणी योजनेच्या लाभापासून वंचित राहत आहेत.
ई-केवायसी पूर्ण करूनही काही महिलांच्या खात्यात पैसे जमा होत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे अनेक महिला थेट महिला व बालविकास कार्यालयात जाऊन माहिती घेत आहेत. मात्र, लाभ पुन्हा कधी सुरू होणार याबाबत अधिकाऱ्यांकडेही स्पष्ट उत्तर नसल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर, पात्र महिलांना न्याय मिळावा आणि नव्याने पात्र ठरलेल्या महिलांनाही लाभ मिळावा यासाठी राज्य सरकारने अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरू करावी, अशी जोरदार मागणी आता सोलापूरातील महिलांकडून केली जात आहे.