चांदूर रेल्वे,
Lightning struck the farm चांदूर रेल्वे तालुक्यातील कळमजापूर येथे शुक्रवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास शेतात कपाशीच्या कामात व्यस्त असलेल्या महिलांवर अचानक वीज कोसळली. या भीषण दुर्घटनेत सुनंदा नरेश सहारे (वय ३७) यांचा जागीच मृत्यू झाला, तर सहा महिला जखमी झाल्या. या घटनेने संपूर्ण कळमजापूर परिसर शोकमग्न झाला आहे.
शेतकरी पाऊस सुरू होताच शेतीच्या कामात असताना अचानक वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट सुरू झाला आणि क्षणार्धात काळाने घाला घातला. वीज थेट शेतात काम करणाऱ्या महिलांवर कोसळल्याने सुनंदा सहारे यांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर महिला गंभीर जखमी झाल्या. या दुर्घटनेत राजकन्या पारिसे (४०), प्रिया डोंगरे (२७), लक्ष्मी रंगारी (३३), सुचिता उगले (३५), पुष्पा केवट (५०) आणि उज्वला भालेकर (३८) या सहा महिला जखमी झाल्या आहेत. त्यापैकी सुचिता उगले यांची प्रकृती गंभीर असून विजेच्या तीव्र धक्क्यामुळे त्यांचा एक हात लुळा पडल्याची प्राथमिक माहिती आहे. सर्व जखमींवर चांदूर रेल्वे येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुमन निकोरे आणि भारती निकोरे या कोणतीही इजा झाली नाही. मृत महिलेच्या कुटुंबाला नैसर्गिक आपत्ती अंतर्गत तात्काळ आर्थिक मदत, जखमी महिलांच्या उपचाराचा संपूर्ण खर्च शासनाने उचलावा तसेच त्यांना योग्य नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.