मुंबई,
Maharashtra Epstein Files 'महाराष्ट्र एपस्टाईन फाईल्स’या आगामी चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित होताच सोशल मीडियासह चित्रपटसृष्टीत जोरदार चर्चा सुरू झाली आहे. महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवणाऱ्या घटनांवर आधारित असलेल्या या चित्रपटात काही वास्तवातील व्यक्तिरेखाही पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटात अभिनेत्री दिपाली सय्यद महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार असून त्यांचा दमदार लूक सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. हा चित्रपट २ ऑक्टोबर २०२६ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

अभिनेत्री, नृत्यांगना आणि विविधांगी भूमिका साकारण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या दीपाली सय्यद आता आणखी एका आव्हानात्मक भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहेत. फर्स्ट लूकमध्ये त्यांची भूमिका अत्यंत प्रभावी दिसत असून त्यांच्या अभिनयाचा पुन्हा एकदा कस लागणार असल्याची चर्चा रंगली आहे. त्यांच्या सोबत फर्स्ट लूकमध्ये अभिनेते उदय टिकेकरदेखील झळकत आहेत. प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती देवेंद्र भट, सूर्यकांत भुंडे आणि प्रशांत कदमपुरे करत आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन स्वरूप बी. सावंत करत असून सध्या चित्रपटाचे चित्रीकरण वेगात सुरू आहे.