मुंबई
monsoon जून महिन्यात राज्यात पावसाने जणू अधिक मासच अनुभवायला लावला असून, अधिक मास संपताच गेल्या दोन दिवसांत मान्सूनने राज्यभर जोरदार हजेरी लावल्याचे चित्र दिसून येत आहे. पश्चिम वऱ्हाडासह राज्याच्या विविध भागांत समाधानकारक पावसाची नोंद झाली असून, 20 जून रोजी राज्यातील एकूण पावसाचे प्रमाण 29.5 मिमी इतके होते. त्यानंतर अवघ्या 96 तासांत राज्यात सरासरी 13.4 मिमी पाऊस झाला असून, हंगामातील एकूण सरासरीच्या 25.8 टक्के पावसाची नोंद राज्याने केली आहे. येत्या सहा दिवसांत मान्सून अधिक सक्रिय होण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात येत असून, त्यामुळे खरीप हंगामाच्या कामांना मोठी गती मिळाली आहे.
पावसाअभावी जमिनीमध्ये पुरेशी ओल नसल्याने नांगरणीनंतरची कामे रखडली होती, मात्र आता ढेकळे फुटण्यास सुरुवात झाल्याने मशागतीच्या कामांना वेग आला आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणीसाठी आधीच लगबग सुरू केली असून, पावसाच्या आगमनामुळे खरीप हंगामातील तयारीला गती मिळाली आहे. पावसाअभावी निर्माण झालेल्या अनिश्चिततेमुळे काही शेतकऱ्यांनी विहिरीच्या पाण्याच्या भरवशावर तुषार आणि ठिबक सिंचनाच्या साहाय्याने पेरण्या केल्या होत्या, मात्र आता झालेल्या दमदार पावसामुळे पिके करपण्याची भीती दूर झाली आहे.
दोन दिवसांच्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचा मोठा खर्च वाचला असून, धूळ पेरण्यांची गरज टळल्याने आर्थिक दिलासा मिळाला आहे. आभाळमायेमुळे पिकांच्या उगवणीवर होणारा संभाव्य नकारात्मक परिणाम टळला असून, पिके जोमाने वाढण्याची शक्यता निर्माण झाली monsoon आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण असून, पुढील काळात मान्सून अधिक सक्रिय राहणार असल्याच्या अंदाजामुळे शेतकरी कामाला लागला आहे.राज्यात सर्वदूर झालेल्या पावसामुळे खरीप पेरण्यांवरील अनिश्चिततेचे सावट दूर झाले असून, शेतकऱ्यांचा उत्साह वाढला आहे. परिणामी, त्यांनी तातडीने खत आणि बियाणे खरेदीसाठी बाजारपेठांकडे धाव घेतली आहे. मागील पंधरा दिवसांत तुरळक असलेली खरेदी आता मोठ्या प्रमाणावर वाढली असून, ग्रामीण भागातील, तालुका आणि बाजारपेठांतील बियाण्यांची दुकाने शेतकऱ्यांनी भरून गेली आहेत. विविध बियाणे, खते आणि शेतीसाठी आवश्यक साहित्य खरेदीसाठी मोठी गर्दी होत असून, यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही चालना मिळत असल्याचे चित्र आहे.
मान्सून राज्यभर व्यापला असून कोकण किनारपट्टीवर ढगांची मोठ्या प्रमाणात जमवाजमव सुरू आहे. वातावरणात बदल होत असून वाऱ्याचा वेगही वाढल्याचे दिसून येत आहे. पुणे येथील हवामान विभागाचे प्रमुख एस. डी. सानप यांच्या माहितीनुसार, येत्या चार ते पाच दिवसांत राज्यभर मुसळधार पावसाची शक्यता आहे. जून महिन्यात सुमारे 72 टक्के पावसाची तूट नोंदवली गेली होती, मात्र पुढील काही दिवसांत ही तूट भरून निघण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. एकूणच राज्यात मान्सूनने जोरदार पुनरागमन केल्याने खरीप हंगामाला अनुकूल वातावरण निर्माण झाले असून, शेतकऱ्यांच्या अपेक्षांना नवे बळ मिळाले आहे.