अनिल कांबळे
नागपूर
Nagpur blackmail case एका प्राथमिक शाळेतील शिक्षिकेला प्रेमजाळ्यात अडकवणे, तिचे अश्लील व्हिडिओ तयार करून ब्लॅकमेल करणे आणि तब्बल पाच लाख रुपयांहून अधिक रकमेची उकळपट्टी केल्याची धक्कादायक घटना अंबाझरी परिसरात उघडकीस आली आहे. त्याने शिक्षिकेचे वारंवार लैंगिक शोषण केले आणि पाच लाख रुपये उकळले. या प्रकरणी अंबाझरी पोलिसांनी प्रणय उमेश दिवे याच्याविरुद्ध बलात्कार, धमकी आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबाझरी परिसरातील एका प्राथमिक शाळेत कार्यरत असलेल्या ३८ वर्षीय शिक्षिकेची आरोपी प्रणय दिवे याच्याशी ओळख झाली होती. शाळेत लाऊडस्पीकर बसविण्याच्या कामानिमित्त आरोपीचा शाळेत आला होता. त्याने शिक्षिकेचा मोबाईल नंबर घेतला. या दरम्यान दोघांमध्ये परिचय वाढला. त्यानंतर आरोपीने विश्वास संपादन करत शिक्षिकेकडून १ लाख रुपये उधार घेतले होते.
काही दिवसांनी घेतलेले पैसे परत करण्याच्या बहाण्याने आरोपी तिच्या घरी गेला. तक्रारीनुसार, त्याने शिक्षकेच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले. याच वेळी त्याने मोबाईल फोनद्वारे तिचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ चित्रीत केले. त्यानंतर हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची तसेच तिच्या कुटुंबीयांना दाखविण्याची धमकी देत आरोपीने ब्लॅकमेलिंग सुरू केली.
दीड वर्ष सुरू होते लैंगिक शोषण
तक्रारीनुसार, जानेवारी २०२५ ते जून २०२६ या कालावधीत आरोपीने वारंवार धमकावून महिलेचे लैंगिक शोषण केले. तसेच बदनामीची भीती दाखवून रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने अशा स्वरूपात सुमारे ५ लाख २ हजार रुपयांची उकळल्याचा आरोप आहे. सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून अखेर पीडित शिक्षिकेने अंबाझरी पोलिस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपीविरुद्ध बलात्कार, गुन्हेगारी धमकी तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा नोंदविला आहे.
आरोपी फरार; विशेष पथकाची नियुक्ती
गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी प्रणय दिवे फरार झाला असून त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष पथक स्थापन केले आहे. आरोपीचा मोबाईल तसेच इतर डिजिटल पुरावे तपासण्यासाठी फॉरेन्सिक तज्ज्ञांची मदत घेण्यात येत आहे. तपासादरम्यान आर्थिक व्यवहार, कॉल रेकॉर्ड आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांचीही छाननी केली जात आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास अंबाझरी पोलिसांकडून सुरू असून आरोपीच्या अटकेनंतर आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.