गे डेटिंग ॲपवरील ओळखीतून अपहरण आणि लुटमार

    दिनांक :26-Jun-2026
Total Views |
नागपूर,

nagpur dating app मोबाईलवर डाऊनलोड केलेले गे डेटिंग ॲपमधून एका डिलीव्हरी बॉयची काही युवकांशी ओळख झाली. त्यामुळे तो त्यांच्या संपर्कात राहायला लागला. त्यांना भेटायला गेल्यानंतर त्यांनी त्या तरुणाचे अपहरण केले. त्याला मारहाण करुन त्याच्याकडून दहा हजार रुपये उकळले. या टोळीला मानकापूर पोलिसांनी अटक केली. अशी माहिती परिमंडळ दोनच्या उपायुक्त अन्नपूर्णा सिंग यांनी दिली.
 
nagpur dating app crime, grindr robbery india,
 
२२ जूनच्या मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणारा पीडित तरुण आपल्या अॅक्टिव्हा दुचाकीने कामावरून घरी जात होता. मानकापूर चौक परिसरात आरोपींपैकी एका तरुणाने त्याच्याकडे लिफ्ट मागितली. पीडिताने मदतीच्या हेतूने त्याला दुचाकीवर बसविले. काही अंतर गेल्यानंतर आरोपीने आपल्या इतर साथीदारांना बोलावून घेतले आणि तेथून संपूर्ण घटनाक्रमाला गुन्हेगारी वळण मिळाले. आरोपींनी पीडिताकडील दुचाकीची चावी, मोबाईल फोन आणि एटीएम कार्ड जबरदस्तीने हिसकावून घेतले. या काळात आरोपींनी पीडिताला त्याच्या परिचितांना फोन करून खोटे कारण सांगत पैसे मागण्यास भाग पाडले. पीडिताच्या मित्र-परिचितांनी त्याच्या खात्यात तीन व्यवहारांद्वारे १० हजार रुपये जमा केले. त्यानंतर आरोपींनी एटीएम कार्डचा वापर करून संपूर्ण रक्कम काढून घेतली. पीडिताचा मोबाईल दगडाने फोडून टाकला आणि पोलिसांकडे तक्रार केल्यास खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली.
 
 
तपासादरम्यान या गुन्ह्यामागील धक्कादायक बाब समोर आली. आरोपींपैकी एक जण पोलो गे डेटिंग ॲपच्या माध्यमातून पीडिताच्या संपर्कात आला होता. काही दिवस चॅटिंग केल्यानंतर तरुणाला मानकापूर चौकात भेटीस बोलावले. हीच संधी साधून टोळीने त्याला सापळ्यात ओढले आणि लुटले. घटनास्थळांवरील आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी मोहम्मद शेख जाकरी मोहम्मद शेख फारुख (२३, राठोड ले आऊट, अनंतनगर), कुणाल मांजरखेडे (१९, पेंशननगर), शोएब अली सुलतान अली सय्यद (२३, गौतमनगर, काटोल मार्ग), फरान फैय्यान खान (२१, कामगारनगर) आणि शिजान शेख फक्रुद्दीन अली अहमद (२१ अनंतनगर) या पाच आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून सीसीटीव्ही फुटेजमधूनही त्यांचा सहभाग स्पष्ट झाल्याने सर्वांना अटक करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर, धिरज भोपडे, अनिल राठोड यांच्या पथकाने ही कारवाई केली.