अनिल कांबळे
नागपूर,
nagpur drug smuggler arrest, अंमली पदार्थाची विक्री आणि तस्करी करणाऱ्यांचा शोध घेत असताना ‘अँटी- नार्कोटिक्स टास्क फोर्स’ ने एका तस्करावर कारवाई करीत अटक केली. मोहम्मद तबरेज मोहम्मद नवाज (रा. महेंद्र नगर गल्ली नंबर ४) असे आरोपी तस्कराचे नाव आहे. तो विदर्भातील सर्वात मोठ्या तस्कर टोळीचा सदस्य असल्याची माहिती समोर आली आहे.
अँटी- नार्कोटिक्स टास्क फोर्स’चे नागपूर युनिटचे पोलिस उपनिरीक्षक शिवाजी टिपूर्णे, सहायक पोलिस उपनिरीक्षक विजय कडू, प्रशांत सलामे, गयाप्रसाद वर्मा, अंकुश गजभीये, मृदुल नगरे हे ड्रग्ज तस्कराचा शोध घेत होते. २२ जूनला त्यांना मोहम्मद तबरेज या तस्कराबाबत माहिती मिळाली. त्यांनी लगेच त्याचा पाठपुरावा करीत त्याच्या हालचालींवर नजर ठेवली. मो. तरबेज हा टेका नाका परिसरात संशयास्पदरित्या फिरताना दिसला. त्याला लगेच ताब्यात घेतले. त्याच्याबाबत सिम्बा ॲपवर माहिती काढली असता तो कुख्यात तस्कर असल्याचे लक्षात आले. त्याच्यावर तहसील पोलिस ठाण्यात ड्रग्ज तस्करीचा गुन्हा दाखल असल्याचे समोर आले. तसेच भंडारा शहरातही तरबेजवर अंमली पदार्थ विक्रीचा गुन्हा दाखल आहे. त्याबाबत सहायक निरीक्षक केशव पुंजरवाड यांच्याकडून गुन्हे अभिलेख तपासला असता मो. तरबेज हा ड्रग्जची तस्करी करण्यासाठी हालचाली करीत असल्याचे कळले. सहायक उपनिरीक्षक विजय कडू यांच्यासह पथकाने सापळा रचून मो. तरबेजला अटक केली. त्याला भंडारा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.